पुणेकरांना खुशखबर! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरु होणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला
हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोची सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांना आहे.

पुणे : पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास सुकर करणारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. या मार्गावरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलैला मंजुरी दिल्याने सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला. राज्य सरकारकडून या सेवेच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या सेवेचे उद्घाटन होणार आहे.
हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोची सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांना आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) स्थानक या १२ स्थानकांदरम्यानच्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलैला मंजुरी दिली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) राज्य सरकारला मेट्रो सेवा सुरू करण्याविषयी पत्र लिहिले. या पत्रात मेट्रोच्या उद्घाटनाची वेळ निश्चित करण्याची विनंती करण्यात आली होती.
‘हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो दोन टप्प्यांत सुरू होणार आहे. पहिला टप्पा माण ते बालेवाडी आणि दुसरा टप्पा बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर असा असेल. माण ते बालेवाडी १२ स्थानकांदरम्यानच्या सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलैला मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे या मार्गावर मेट्रो ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे. सर्व तपासण्या, चाचण्या आणि सुरक्षा मानकांची पूर्तता झाल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने ही सेवा सुरू करण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील दिवस निश्चित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधानांच्या वेळेसाठी प्रतीक्षा?
‘पुण्यातील आतापर्यंतच्या सर्व मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यास हिरवा झेंडा पंतप्रधान मोदी यांनीच दाखविला आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी भूमिका मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली होती. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले होते. पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडले होते,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
लवकर सुरू करण्यास प्राधान्य
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सेवा लवकरात लवकर सुरू करण्यास आमचे प्राधान्य आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिले होते. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
