शाळांच्या कँटीनवर ‘एफडीए’ची नजर; पुणे विभागात शाळा परिसरातील दोन आस्थापनांवर कारवाई
अस्वच्छता व परवान्याशिवाय अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई; अटींचा भंग करणाऱ्यांवर टाळे.

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत विद्यार्थांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी २८ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत धडक मोहीम राबविली. या अतंर्गत पुणे विभागात ६५ शाळांची तपासणी करण्यात आली. पैकी दोन आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचे व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रशासनाने पुणे विभागात जनजागृतीसाठी २१ कार्यशाळा आयोजिल्या. यामध्ये ५ हजार ७६२ शाळा आणि ६ हजार ६३२ शिक्षक सहभागी झाले. या मोहिमेंतर्गत पुणे विभागातील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिला बालविकास अधिकाऱ्यांबरोबर थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकांचा धडाका लावून अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला.
यानंतर शाळांच्या ५० मीटर परिसरातील कँटीन, टपऱ्या आणि दुकानांची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली. अस्वच्छता, मुदतबाह्य पदार्थांची विक्री किंवा परवान्याशिवाय सुरू असलेल्या खाद्य आस्थापनांवर तत्काळ टाळे ठोकण्याचे निर्देश देण्यात आले.
‘विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दया-माया न दाखवता अत्यंत कडक कारवाई पुढेही सुरूच राहील,’ असे ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शालेय परिसरात अस्वच्छ किंवा संशयास्पद खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिकांनी त्वरित टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा महाएफडीए पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन ‘एफडीए’ने केले आहे.
अन्न औषध प्रशासनाचे धाड सत्र
पुणे विभागात विविध ठिकाणी छापे : ‘एफडीए’च्या पथकाने इंदापूर तालुक्यातील लकडी येथील आस्थापनेतील गायीच्या दुधाची तपासणी केली. घटनास्थळी केलेल्या आम्लता तपासणीमध्ये हे दूध अवमानक (निकृष्ट) असल्याचे स्पष्ट झाल्याने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. एकूण १,३१,५६० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. वारजे येथील मिसळ दुकानाची अचानक तपासणी केली असता, खाद्यपदार्थांमध्ये मानकापेक्षा जास्त व अयोग्य कृत्रिम रंगाचा वापर आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा केल्याचे आढळले. प्रशासनाने या हॉटेलचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला. मार्केट यार्ड परिसरातील धाडीत परवान्याविना व्यवसाय आणि लेबलिंगमध्ये घोळ आढळल्याने साठा जप्त करण्यात आला, तर खेड तालुक्यात निकृष्ट दर्जाचा पांढरा वाटाण्याचा साठा जप्त केला गेला, असे ‘एफडीए’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले.
