धक्कादायक! कंंत्राटदारांच्या ‘पीएमपी’ बस ठरतायत जीवघेण्या? पाच महिन्यांत ११ मृत्यू; आता अपघात झाल्यास ३ लाख रुपयांपर्यंत भरपाई
या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने अपघातातील मृतांच्या भरपाईत वाढ करून ती ३ लाख रुपये केली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस जीवघेण्या ठरू लागल्या असून, गेल्या पाच महिन्यांत ‘पीएमपी’ वाहनांच्या अपघातात ११ मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये नऊ जणांचे मृत्यू हे भाडेतत्त्वावरील कंत्राटदाराच्या वाहनांमुळे झाल्याचे समोर आले आहे. ‘पीएमपी’च्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ‘पीएमपी’च्या गाड्यांचे २३ अपघात झाले. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले.
या अपघातांमध्ये खासगी कंत्राटदारांच्या गाड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘पीएमपी’च्या मालकीच्या गाड्यांचे सात अपघात झाले. त्यात दोन मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या कंत्राटदाराच्या गाड्यांचे १६ अपघात झाले. त्यात नऊ मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले. नुकत्याच झालेल्या एका अपघातात बावीस वर्षांचा मुलगा ‘पीएमपी’ची भाडेतत्त्वावरील गाडी चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या ‘पीएमपी’च्या ताफ्यात स्वमालकीच्या सुमारे ६८४ गाड्या आणि २ हजार ३६४ चालक आहेत. तर भाडेतत्त्वावरील १ हजार २७७ गाड्यांसाठी ३ हजार २१४ चालक आहेत. तसेच सर्व ‘ई-बस’ खासगी ठेकेदारांमार्फत चालविण्यात येतात. एप्रिल २०२५ पासून वाहनचालकांना प्रशिक्षण देण्याची मोहीम ‘पीएमपी’ने हाती घेतली. त्यात सुरक्षित वाहन चालविण्यासह आणीबाणीच्या काळातील उपाययोजना, समुपदेशन आदी प्रशिक्षण दिले जाते.
अपघाताचे स्वरुप…..महामंडळाच्या गाड्या… भाडेतत्त्वावरील गाड्या
मृत्यू….०२…..०९
गंभीर जखमी….०३….०७
किरकोळ जखमी….०१…०१
एकूण अपघातग्रस्त….०६….१७
‘पीएमपी’चे चालक….खासगी चालक
प्रशिक्षण घेतलेले….२,६४०…….१,९४७
प्रशिक्षण न घेतलेले….५७४…….४१७
एकूण चालक…..३,२१४……..२,३६४
‘पीएमपी’कडून अपघातग्रस्तांच्या मदतीत वाढ
‘पीएमपी’च्या गाड्यांच्या अपघातात जखमींना ५० हजार रुपये, तर मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्यात येत होती. आता या मदतीत वाढ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला असून, जखमींना १ लाख रुपये आणि मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये भरपाई म्हणून तातडीने देण्यात येणार आहेत. तसेच अपघातांमध्ये मालमत्तेचे नुकसान झाल्यास सरकारी नियमांनुसार पंचनामा करून भरपाई देण्याचा निर्णय सोमवारी (२४ ऑगस्ट) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘डॅश कॅम’चा प्रस्ताव कागदावरच
‘‘पीएमपी’च्या गाड्या आकाराने मोठ्या असतात. गाडीच्या समोरून होत असलेल्या अपघांतांची अचूक माहिती मिळावी, म्हणून डॅश कॅम बसविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडला होता. हे कॅमेरे गाडीच्या समोरील बाजूचे आणि चालकाच्या बाजूचे आतील दृश्य टिपणारे ‘ड्युअल फेस’ कॅमेरे असतील. त्यामुळे अपघातात नेमकी कुणाची चूक होती, हेही समजले असते. मात्र, तीन वेळा प्रस्ताव मांडूनही संचालक मंडळाकडून मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाल्यास अपघातांचे नेमके कारण शोधणे सहज शक्य होईल,’ असे ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी सांगितले. तसेच गाडीच्या मागील बाजूने होणाऱ्या अपघातांचे कारण शोधण्यासाठीही विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपघात जाणीवपूर्वक होत नाहीत. मात्र, त्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून वाहन चालक-वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पीएमपीच्या आणि खासगी कंत्राटदारांच्याही वाहन चालकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यातूनही अपघात झाल्यास संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. -महेश आव्हाड अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
