पत्रकारिता आणि प्रशासनातील स्नेहबंध अधिक दृढ ; पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचा दिवाळी फराळ उत्साहात !
महापौर रवी लांडगे,आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती
१५ वर्षांची स्नेहसंमेलनाची परंपरा कायम

पिंपरी | प्रतिनिधी
पत्रकारिता आणि प्रशासन यांच्यातील सुसंवाद, सहकार्य आणि स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत, तसेच समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर २०२६) आयोजित या स्नेहमेळाव्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवीभाऊ लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून दिवाळी फराळाचे आयोजन करण्याची परंपरा जपली जात आहे. समाजातील विविध घटकांशी पत्रकारांचे सलोख्याचे आणि स्नेहपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, या हेतूने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी फराळ साजरा केला जातो. यापूर्वी महापालिकेचे सफाई कर्मचारी, शिपाई, सुरक्षा रक्षक तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करून हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. पत्रकार आणि प्रशासन हे शहराच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक असून, परस्परांमधील संवाद आणि विश्वास वाढविण्यासाठी अशा स्नेहमेळाव्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या स्नेहमेळाव्यास महापौर रवीभाऊ लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, ज्येष्ठ नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, शहर अभियंता मनोज सेठीया, नगर सचिव उल्हास जगताप, कार्यकारी अभियंते सुनील पवार, विजय भोजने, श्री. काशीद, लक्ष्मीकांत कोल्हे, बाळासाहेब लांडे, प्रमोद बोरसे, शशिकांत मोरे, सोहम निकम, डी. डी. पाटील, सूर्यकांत मोहिते, सहशहर अभियंता बापू गायकवाड, विनय ओव्हाळ, अनिल भालसाखळे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, संध्या वाघ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखापाल सत्यवान उबाळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित या दिवाळी फराळाचा सर्व मान्यवरांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकमेकांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. स्नेह, आपुलकी आणि आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, विनय लोंढे, रेहान सय्यद, सरचिटणीस मुकेश जाधव, सचिव संतोष जराड, प्रसिद्धीप्रमुख युनूस खतीब, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गवळी, अशोक लोखंडे, अमोल डंबाळे आणि शबनम सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. शहरातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
