पिंपरी चिंचवडबातम्या

सांगवी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण…. 

भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे संविधान शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार…आभदार शंकर जगताप.. 

पिंपरी, दि. २६ नोव्हेंबर २०२६:- सांगवी येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या संविधान शिल्पाचे आजच्या संविधान दिवशीच लोकार्पण होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे,भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे संविधान शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या शिल्पाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचला जाईल असे प्रतिपादन आभदार शंकर जगताप यांनी केले. 

     पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२, सांगवी येथे भारतीय संविधान शिल्पाच्या नूतनीकरणाचे  काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून या नूतनीकृत संविधान शिल्पाचे लोकार्पण आमदार  शंकर जगताप यांच्या शुभहस्ते आज झाले,त्यावेळी संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. 

     या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे,शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे,पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे,माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी,आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन… 

“आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा; आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू” असा निर्धार उपस्थितांनी मान्यवरांच्या समवेत केला,संविधान प्रास्ताविकेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 

      नूतनीकरण झालेल्या संविधान शिल्पाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराच्या लौकीकात भर पडणार असून भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे.