पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या नाकखाली १०४ वर्ष जुन्या ५२ वृक्षांची क्रूर कत्तल; उद्यान विभागाच्या भूमिकेवर गंभीर शंका- आप ऋषिकेश कानवटे

पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाच्या अगदी शेजारी सुरू असलेल्या एका खाजगी प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करत, तब्बल ५२ जुन्या झाडांची अत्यंत निर्घृणपणे कत्तल करण्यात आली आहे. या अत्यंत धक्कादायक आणि पर्यावरणविरोधी प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आप युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकल्पातील झाडांचे सरासरी वय अंदाजे १०४ वर्षे होते. इतकी जुनी आणि पर्यावरण समतोल राखणारी झाडे केवळ एका खाजगी बिल्डरच्या फायद्यासाठी उद्ध्वस्त करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
अंधाधुंद कत्तल: प्रकल्पातील एकूण ५२ झाडांपैकी तब्बल ३३ झाडे मुळासक उपटून टाकण्यात आली असून ती पूर्णपणे मृत झाली आहेत.
फक्त दंडात्मक कारवाईचा फार्स: उद्यान विभागाने वृक्षतोडीची भरपाई म्हणून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून प्रति झाड १५ हजार रुपयांप्रमाणे केवळ २० लाख ७० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. मात्र, पैशांच्या मोबदल्यात मोलाची हरित संपदा नष्ट करणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे.
पुनर्पणाचा दावा फोल: उर्वरित १९ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल असा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात ही झाडे जगणार का, याबद्दल वृक्षप्रेमींनी शंका उपस्थित केली आहे.
’आप’ युवा आघाडीची आक्रमक भूमिका:
या संपूर्ण प्रकरणावर तीव्र आक्षेप घेत आम आदमी पार्टीचे युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या नाकाखाली जर झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असेल, तर शहरातील इतर भागातील झाडे किती सुरक्षित असतील? केवळ दंड वसूल करून महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही. आर्थिक दंडापेक्षा या झाडांचे पर्यावरणीय मूल्य कितीतरी पटीने अधिक होते. महापालिका आयुक्तांनी तात्काळ उद्यान अधिकाऱ्यांना नोटीस काढून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.”
तसेच, या प्रकरणी दोषी असणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित उद्यान विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ऋषिकेश कानवटे यांनी केली आहे. अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे
