सर्वांना सहकार्य करणाऱ्या उपअभियंता सुरेखा कुलकर्णी ऑगस्ट अखेर सेवानिवृत्त होणार !

पिंपरी (प्रतिनिधी) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सौ. सुरेखा सुधीर कुलकर्णी या ऑगस्ट अखेर आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत. सुमारे ३० वर्षांच्या सेवाकाळात विविध विभागांमध्ये कार्यरत राहून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे.
सन १९९६ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या सुरेखा कुलकर्णी यांनी सुरुवातीला सुमारे ११ वर्षे स्थापत्य विभागात काम केले. त्यानंतर जलनिस्सारण विभाग, पर्यावरण विभाग आणि पाणीपुरवठा विभागात त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. स्थापत्य विभागात ११ वर्षे, पर्यावरण विभागात ७ वर्षे आणि पाणीपुरवठा विभागात ५ वर्षे त्यांनी सेवा बजावली आहे.
महापालिकेच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. हेगडेवार भवन, प्राधिकरण बिल्डिंग तसेच जलशुद्धीकरण केंद्राशी संबंधित कामांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महापालिकेतील पहिल्या महिला अभियंत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, पाणीपुरवठा विभागातील त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले जाते.
अभियांत्रिकी क्षेत्रातील जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतानाच सुरेखा कुलकर्णी यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सन २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहराचे गौरवगीत तयार करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मोबाईल रिंगटोन तयार करण्यातही त्यांचा सहभाग राहिला.
त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ अधिकारी म्हणून मर्यादित नसून त्या उत्साही, आनंदी आणि प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या म्हणून परिचित आहेत. कार्यालयीन सहकारी असोत अथवा इतर नागरिक-गरजू व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती अनेकांना भावते.
कविता लेखन आणि उत्तम निवेदन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेआणखी एक वैशिष्ट्य. हसता-बोलता, चालता-चालता प्रत्येकप्रसंगावर आणि शब्दावर कविता करण्याचे त्यांचे कौशल्य विशेष आहे. योगासनांवरही त्यांनी गीताची निर्मिती केली आहे. त्यांच्या ओघवत्या आणि प्रभावी निवेदनामुळे विविध कार्यक्रमांना वेगळी रंगत प्राप्त झाली आहे.
पिंपरी चिंचवडमधील ‘स्वरसागर महोत्सवा’च्या आयोजनातही गेल्या २७ वर्षापासून त्यांचा पुढाकार राहिला आहे. प्रशासनातील जबाबदारीसोबतच सांस्कृतिक क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ त्यांनी सातत्याने जपली. सुरेखा कुलकर्णी यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची असलेली ओळख. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सहकारी आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरवही केला जात आहे.
महापालिकेच्या सेवेत तब्बल तीन दशके योगदान देऊन सेवानिवृत्त होत असलेल्या सौ. सुरेखा सुधीर कुलकर्णी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि आनंद लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा ‘सखी लाईन’च्या वतीने देण्यात येत आहेत.
