पिंपरी चिंचवडबातम्या

गणेशोत्सवापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर खड्डेमुक्त करा – नाना काटे

पिंपरी-चिंचवड : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून शहर खड्डेमुक्त करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविक, नागरिक आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढते. अशा परिस्थितीत शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर असलेले खड्डे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर समस्या ठरू शकतात. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होण्याची शक्यता असून, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे काटे यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा उत्सव आहे. या काळात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कोणत्याही नागरिकाला अपघाताला सामोरे जावे लागू नये, ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग, विसर्जन मार्ग, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणांवरील रस्त्यांची विशेष पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण व रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी काटे यांनी केली.

“रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न केवळ नियमित देखभालीचे काम म्हणून न पाहता नागरिकांच्या जीविताशी निगडित महत्त्वाचा विषय म्हणून गांभीर्याने घ्यावा. गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,” असे विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.