पिंपरी चिंचवडबातम्या

कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे  गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार 

खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी – कासारवाडी आणि फुगेवाडी येथील रेल्वे फाटक बंद करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू असताना स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. कासारवाडी येथील रेल्वे फाटकाच्या जागेवर भुयारी मार्ग तयार करण्याबाबत रेल्वे व महापालिका अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी दिल्या आहेत.

कासारवाडी येथील पाहणीवेळी रेल्वे विभागाचे शुभम निकम, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहशहर अभियंता प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता विजय भोजने, नगरसेविका मनीषा लांडे, प्रतीक्षा जवळकर, माजी नगरसेवक शाम लांडे, प्रकाश जवळकर, दत्तोबा लांडगे, किरण मोटे, देवदत्त लांडे, सागर पाचारणे, निलेश लांडे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. फुगेवाडीतील पाहणीवेळी  नगरसेवक राजू बनसोडे,  माजी नगरसेविका उषा वाखारे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर संघटक निलेश हाके, मनोज वाखारे, यशवंत वाखारे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, कासारवाडी गावाचे रेल्वे लाईनमुळे दोन भाग झाले आहेत. स्मशानभूमी आणि शाळा दुसऱ्या बाजूला असल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन पाहणी केली.  फुगेवाडी येथेही स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रस्तावित अंडरपासच्या कामाची पाहणी करण्यात आली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत अंडरपासचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली. या दोन्ही कामांमुळे कासरवाडी आणि फुगेवाडी परिसरातील नागरिकांचा व रहिवाशांचा ये-जा करण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.