कामशेतमधील पॅराग्लायडिंग साहसी खेळ टिकणार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
विद्युत विभागाच्या वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मावळ – मावळ तालुक्यातील कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिल हा साहसी खेळ वाचविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर गुरुवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे महत्वाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे पॅराग्लायडिंगला कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय एम राव, उपाध्यक्ष विनोद शेलार, विद्युत वाहिनीचे काम करणारे अदानी पॉवरचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. कामशेत येथील प्रस्तावित वीज वाहिन्यांच्या पोलमुळे पॅराग्लायडिंग हिलला अडथळा निर्माण होणार होता. याबाबत कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी केली होती. त्यावर खासदार बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांची भेट घेतली होती. तीन खांबासाठी ३० वर्षांपासून चालू असलेला पॅराग्लायडिंग हा क्रीडा प्रकार बंद करणे चुकीचे आहे. पोल बाजूने घेता येऊ शकतात, असे सांगितले. त्यावर अग्रवाल यांनी खासगी कंपनीशी चर्चा करुन फेरसर्व्हे करावा. पोल बाजूने घेऊन जावेत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वीज वाहिनीचा मार्ग बदलावा. कोणत्याही परिस्थितीत या खेळाला अडथळा येता कामा नये, असे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून विकसित झालेला पॅराग्लायडिंग हिल हा क्रीडा प्रकार कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. हा खेळ महाराष्ट्रात केवळ पाचगणी, कामशेतमध्येच खेळला जातो, असे खासदार बारणे यांनी सांगितले.
कामशेत येथील ‘टॉवर हिल’ हे पॅराग्लायडिंगसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक आणि शेकडो प्रशिक्षणार्थी पायलट येत असतात. सुनीत राव यांसारख्या आंतरराष्ट्रीय पायलटनी येथूनच प्रशिक्षण घेऊन जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. तसेच, सप्टेंबर ते मार्च या पूर्वेकडील वाऱ्यांच्या हंगामात उड्डाणांसाठी टॉवर हिलशिवाय दुसरा कोणताही व्यवहार्य पर्याय उपलब्ध नाही. या उद्योगावर स्थानिक वाहतूकदार, होमस्टे, कॅफे, रेस्टॉरंट्स आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कामशेत परिसर राष्ट्रीय स्तरावरील विमान क्रीडा केंद्र, पर्यटन स्थळ आणि ग्रामीण रोजगाराचा महत्त्वाचा आधार आहे. प्रस्तावित मार्ग मुख्य उड्डाण क्षेत्रातून जाणार होता. आता हा मार्ग बदलण्यात येणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे खासदार बारणे म्हणाले.
गेल्या तीन दशकांपासून कामशेत हे भारतातील प्रमुख पॅराग्लायडिंग स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे मनोरंजनात्मक उड्डाणे, व्यावसायिक टँडम उड्डाणे, वैमानिक प्रशिक्षण तसेच स्पर्धात्मक विमान क्रीडा उपक्रम चालतात. भौगोलिक स्थान, डोंगररचना, उंची आणि अनुकूल वाऱ्याच्या परिस्थितीमुळे हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे वर्षातील जवळपास आठ ते नऊ महिने उड्डाणाची संधी उपलब्ध असते. देशभरातील वैमानिक घडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या स्थळाने भारतातील पॅराग्लायडिंग समुदाय विकसित करण्यात आणि सुरक्षित उड्डाण पद्धती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
