बातम्या

पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांना २० कोटींचे आर्थिक बळ!

– मोशीतील उद्यान, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, अंतर्गत रस्ते आणि व्यायामशाळांसाठी निधी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

भोसरी विधानसभा मतदारसंघातील मोशी, चऱ्होली, जाधववाडी, दिघी, डुडुळगाव, चिखली आणि भोसरी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला आर्थिक बळ मिळणार आहे. विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने तब्बल २० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला असून, एकूण १०२ विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पायाभूत सुविधा, अंतर्गत रस्ते आणि व्यायामशाळांच्या उभारणीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मोशी येथील उद्यान विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपये, तर बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथे एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याकरिता पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विशेष म्हणजे, जाधववाडी आणि चऱ्होली परिसरातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठीही मोठ्या प्रमाणात कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जाधववाडीतील पंतनगर, वणवेचाळ परिसर तसेच चऱ्होलीतील किवळे मळा, सृष्टी पार्क, मोरयानगर, काळजेवाडी, श्रीराम कॉलनी आणि गंधर्व पार्क परिसरातील रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. या कामांमुळे संबंधित भागांतील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय मोशी, दिघी, चऱ्होलीतील दाभाडेवस्ती, डुडुळगाव, चिखली, भोसरी आणि जाधववाडी येथे प्रत्येकी एक अशा सात व्यायामशाळांच्या उभारणीसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक युवकांना व्यायामाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी २० कोटी रुपयांच्या निधीला मिळालेली मंजुरी ही परिसरातील पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. विशेषतः मोठ्या प्रकल्पांबरोबरच नागरी वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि युवकांसाठी व्यायामशाळा अशा स्थानिक गरजांवरही या निधीतून भर देण्यात आला आहे.

या कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून, प्रकल्प खर्चाचा संपूर्ण हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. संबंधित कामांना आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणि ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. निधी वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे टप्प्याटप्प्याने जारी करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

“पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हाच आमचा संकल्प आहे. वाढत्या नागरीकरणाचा विचार करून नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी आणि युवकांना क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारसंघातील १०२ विकासकामांसाठी तब्बल २० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळणे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने शहराच्या विकासासाठी दिलेल्या या आर्थिक बळाबद्दल मनःपूर्वक आभार! मंजूर विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आमचा पाठपुरावा कायम राहील. पिंपरी-चिंचवडकरांचा विश्वास हीच आमची ताकद आणि शहराचा शाश्वत विकास हेच आमचे ध्येय आहे!”
– महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.