बातम्या

पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर आणि स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे यांची निवड

वीस डिसेंबरला मोशी येथे पाचवे साहित्य संमेलन 

पिंपरी (दिनांक : १९ नोव्हेंबर २०२६) पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इतिहास संशोधक, साहित्यिक संदीप भानुदास तापकीर यांची; तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कांबळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अरुण बोऱ्हाडे आणि सचिव रामभाऊ सासवडे यांनी दिली. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत या दोन्ही नावांवर एकमत झाले. अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष सोपान खुडे होते. याप्रसंगी डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, दामोदर वहिले, योगेश कोंढाळकर, श्रीहरी तापकीर, माणिक सस्ते, काळुराम सस्ते, संगीता थोरात, सुनील जाधव, तेजस्विनी देशमुख, संतोष सस्ते, अशोक ढोकले, अलंकार हिंगे, महीपती साठे, गोविंद आल्हाट इत्यादी सदस्य उपस्थित होते.

मोशी येथील जयगणेश सभागृहात वीस डिसेंबर रोजी हे संमेलन संपन्न होणार आहे. 

संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले संदीप तापकीर हे इतिहास संशोधक असून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर त्यांची जिल्हानिहाय आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय’ या मराठी शिवचरित्राचा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी शंभरहून अधिक पुस्तकांचे संपादन केले आहे.

स्वागताध्यक्षपदी निवड झालेले डॉ. कांबळे हे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ असून मोशीतील साईनाथ रुग्णालयाचे ते संचालक आहेत. एक संवेदनशील मनाचे, समाजाभिमुख  व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना कलेची आणि साहित्याची विशेष रुची आहे. याचवर्षी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून गेले आहेत. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा आणि संदीप तापकीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यिक श्रीकांत चौगुले, व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, दुर्गअभ्यासक नीलेश गावडे, गणेश साहेबराव सस्ते, संतोष गोलांडे, भानुदास तापकीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.