बातम्या

नाशिक फाटा-खेड आठपदरी ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ भूसंपादन पूर्ण!

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यानंतर एनएचएआयचा अहवाल
– २८ ऑक्टोबरला ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ जारी, प्रकल्पासाठी ३६ महिन्यांची मुदत

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पुणे–नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) या आठपदरी उन्नत मार्गासाठी आवश्यक संपूर्ण जमिनीचा कागदोपत्री ताबा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) मिळाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रस्तरावर प्रकल्पाला चालना मिळाली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने भूसंपादन आणि आर्थिक बाबींमध्ये सहकार्य केले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मागविलेल्या अहवालात एनएचएआयने निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ जारी केल्याचे स्पष्ट केले आहे.

भोसरी–चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी, कामगारांची दैनंदिन ये-जा आणि मालवाहतुकीतील अडचणी लक्षात घेऊन आमदार लांडगे यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएचएआयला पत्र दिले होते. भूसंपादन, निविदा, राज्य शासनाचे आर्थिक सहकार्य आणि पुढील कामांचे वेळापत्रक याबाबत त्यांनी सविस्तर माहिती मागविली होती. त्या अनुषंगाने एनएचएआयच्या पुणे प्रकल्प कार्यालयाने ४ नोव्हेंबर रोजी मुद्देनिहाय अहवाल तयार केला.

एनएचएआयच्या अहवालानुसार, प्रकल्पासाठी यापूर्वी ९३ टक्के जमीन उपलब्ध होती. प्रवेश आणि निर्गमन रॅम्पसाठी आवश्यक उर्वरित १०.६९ हेक्टर जमिनीच्या संपादनाला पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्यात आली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक संपूर्ण जमिनीचा कागदोपत्री ताबा एनएचएआयकडे सुपूर्द केला आहे. राज्य जीएसटीची प्रतिपूर्ती आणि रॉयल्टीतील सवलतींना राज्य शासनाने मंजुरी दिल्याचेही अहवालात नमूद आहे.

‘व्हीजन-२०२०’मधील प्रकल्प आता बांधकामाच्या उंबरठ्यावर
आमदार लांडगे यांच्या ‘व्हीजन-२०२०’मधील हा सुमारे २९.९२ किलोमीटरचा आठपदरी उन्नत मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वर उभारला जाणार आहे. नऊ प्रमुख जंक्शन, दोन मोठे पूल, दोन्ही बाजूंना सेवा रस्ते आणि प्रवेश-निर्गमनासाठी रॅम्प यांचा प्रकल्पात समावेश आहे. या मार्गामुळे भोसरी–चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. बांधकामपूर्व मंजुऱ्या आणि भूसंपादनासाठीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, एनएचएआयने ‘अपॉइंटेड डेट’ अर्थात काम सुरू करण्याची अधिकृत तारीख जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. त्या तारखेपासून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
******


“भोसरी–चाकण औद्योगिक पट्ट्यात रोज ये-जा करणाऱ्या कामगारांचा आणि प्रवाशांचा वाहतूक कोंडीत जाणारा वेळ वाचावा, यासाठी नाशिक फाटा–खेड आठपदरी उन्नत मार्गाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने या प्रकल्पाला आर्थिक सहकार्य दिले. ‘व्हीजन-२०२०’मधील या प्रकल्पासाठी आवश्यक संपूर्ण जमिनीचा कागदोपत्री ताबा एनएचएआयला मिळाला असून कंत्राट मंजुरीचे पत्रही जारी झाले आहे. आता काम सुरू करण्याची अधिकृत तारीख लवकर जाहीर व्हावी आणि त्या तारखेपासून ३६ महिन्यांच्या निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहील.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.