पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये १७ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद; देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती

भिक्खुणी संघापासून आजच्या बौद्ध महिला चळवळीपर्यंतचा प्रवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आणि भविष्यातील वाटचालीवर होणार विचारमंथन

बाबासाहेबांच्या ऐतिहासिक महिला परिषदेच्या वारशातून बौद्ध महिला नेतृत्वाचा नवा अध्याय!

१९४२ च्या नागपूर परिषदेच्या प्रेरणेतून पुण्यात १७ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद; स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर होणार मंथन

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – बौद्ध महिलांचा ऐतिहासिक प्रवास, वर्तमानातील स्थान आणि भविष्यातील वाटचाल यांवर विचारमंथन करण्यासाठी भारतासह श्रीलंका, व्हिएतनाम, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया येथील बौद्ध भिक्खुणी, विचारवंत, संशोधक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. ‘विस्डम इन मोशन फोरम’ आणि ‘कॅटॅलिस्ट फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद पुणे २०२६’ ही परिषद शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे.

‘बौद्ध महिलांचा प्रवास : प्रज्ञा, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तन’ ही परिषदेची संकल्पना आहे. भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघाच्या परंपरेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांनी बौद्ध समाजात घडवलेल्या बदलांपर्यंतचा आढावा घेत महिलांच्या सद्यस्थितीतील प्रश्नांवर आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक 

उपाययोजनांवर परिषदेत चर्चा होणार आहे, अशी माहिती आयोजन समितीच्या अध्यक्षा व प्रसिद्ध भूलरोगतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला आंदुरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या हरिभक्त, वैद्यकीय नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे आणि पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक लक्ष्मीकांता माने यांनी दिली.

परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि दलित स्त्रीवादी अभ्यासक प्रा. डॉ. विमल थोरात यांच्या हस्ते होणार आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या प्रथम महिला प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान आणि कामगार सहआयुक्त शिरीन संजू लोखंडे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

परिषदेतील प्रमुख वक्त्यांमध्ये श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठाच्या विभागप्रमुख प्रा. मनोरी पी. सेनानायके, मुंबई विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. योजना भगत, ऑस्ट्रेलियातील नवयान बौद्ध चॅरिटेबल ऑर्गनायझेशनच्या संचालिका व शिक्षणतज्ज्ञ डॉ. रुपाली मुन, व्हिएतनामच्या भिक्खुणी व संशोधक भिक्खुणी विसुद्धिपञ्ञा, पुण्यातील मानसशास्त्रज्ञ व विपश्यना शिक्षिका डॉ. नीलम ओसवाल आणि कोरियातील भिक्खुणी व संशोधक भिक्खुणी महाकासा यांचा समावेश आहे. दैनंदिन जीवनातील बौद्ध मूल्ये, शिलालेखांतून उलगडणारा धम्म, परदेशातील आंबेडकरी विचारांची भूमिका, व्हिएतनामी बौद्ध भिक्खुणींचे योगदान, मानसिक ताण-तणावांवर धम्माच्या माध्यमातून मात आणि कोरियन भिक्खुणी संघाचे कार्य अशा विविध विषयांवर हे वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

पहिल्या चर्चासत्रात ‘बाबासाहेबांना अभिप्रेत समाजाभिमुख बौद्ध धम्म’ या विषयावर चर्चा होणार असून डॉ. दीप्ती किरतकर सूत्रसंचालन करणार आहेत. या चर्चासत्रात अभिनेत्री चिन्मयी सुमीत, शल्यचिकित्सक डॉ. शिल्पा चौधरी (पाझारे) आणि रविवार धम्मशाळेच्या संस्थापिका व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील नेत्या शिवांजली गायकवाड सहभागी होणार आहेत. डॉ. शिल्पा चौधरी या १९४२ मधील ऐतिहासिक महिला परिषदेत कार्यरत असलेल्या जाईबाई चौधरी यांच्या पणती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, समाजाभिमुख बौद्ध धम्माची मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनातील महिलांचे योगदान यांचा वेध या सत्रात घेतला जाणार आहे.

दुसरे चर्चासत्र ‘२१ व्या शतकातील भिक्खुणी संघ : आव्हाने, पुनरुज्जीवन आणि पुढील वाटचाल’ या विषयावर होणार असून लक्ष्मीकांता माने सूत्रसंचालन करणार आहेत. श्रीलंकेतील भिक्खुणी उप्पलवण्णा थेरी, तिबेटी बौद्ध भिक्खुणी व माजी बॉलीवूड अभिनेत्री द्रुपोन ग्याल्तेन साम्तेन (बरखा मदान), अखिल भारतीय भिक्खुणी संघाच्या सचिव भंते सुनीती भिक्खुणी आणि बोधिपक्खिय धम्म फाउंडेशनच्या संस्थापक भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना या चर्चेत सहभागी होणार आहेत. भिक्खुणी संघाची ऐतिहासिक परंपरा, त्याच्या पुनरुज्जीवनातील आव्हाने, महिलांचा धम्मातील सहभाग आणि भविष्यातील संधी यांवर या सत्रात विचारमंथन होणार आहे.

तिसऱ्या चर्चासत्रात ‘जयभीम २.० : तरुणाईतील वाढता जयभीम क्रेझ’ या विषयावर चर्चा होणार आहे. ॲड. कोमल शिंदे सूत्रसंचालन करणार असून लेखिका, कवयित्री व वक्त्या मीनाक्षी इंगळे, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या व विद्यार्थी चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. सांची कांबळे आणि बीबीसीच्या वार्ताहर छाया काविरे सहभागी होणार आहेत. नव्या पिढीतील आंबेडकरी अस्मिता, जयभीम विचारांचा वाढता प्रभाव आणि तरुणाईच्या सामाजिक सहभागाला विधायक परिवर्तनाची दिशा देण्याच्या शक्यतांवर या चर्चासत्रात भर दिला जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ मध्ये नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स’ या ऐतिहासिक महिला परिषदेच्या वारशातून या उपक्रमाला प्रेरणा मिळाली आहे. बुद्धांच्या समतेच्या शिकवणीला आंबेडकरी चळवळीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांशी जोडत बौद्ध महिलांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या पुढील उपाययोजनांवर परिषदेत विचारमंथन केले जाणार आहे.

परिषदेच्या माध्यमातून देश-विदेशातील बौद्ध महिलांमध्ये संवाद आणि सहकार्य वाढवणे, महिला नेतृत्वाला चालना देणे, संशोधन व सामाजिक कृती यांच्यात समन्वय साधणे आणि अधिक समताधिष्ठित, करुणामय व प्रबुद्ध समाजाच्या निर्मितीसाठी सामूहिक दिशा निश्चित करणे हा आयोजकांचा प्रयत्न आहे. महिलांनी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत नेतृत्वकर्त्याची भूमिका बजावावी, यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरेल, असे आयोजकांनी सांगितले.