जिल्ह्यातील निराधार गरजू मुलांना १ हजार ५१ हिवाळी जॅकेटचे वाटप
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिनानिमित्त मोशीच्या युवकांचा उपक्रम
– चार तालुक्यांतील १२ शाळा, आश्रम आणि वसतिगृहांपर्यंत पोहोचली मदत

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त मोशीतील युवा कार्यकर्त्यांनी गरजू मुला-मुलींना १ हजार ५१ हिवाळी जॅकेटचे वाटप केले. २७ नोव्हेंबरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हवेली, खेड, जुन्नर आणि शिरूर परिसरातील अनाथाश्रम, वसतिगृहे, आश्रमशाळा आणि आदिवासी डोंगरभागातील शाळांना कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. मुलांना दिलेल्या जॅकेटवर मोशीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे छायाचित्र आहे.
आळंदी देवाची येथील श्री संत गुरुकृपा वारकरी व सामाजिक संस्था, चिंबळीतील ओम शांती मुलींचे बालक आश्रम, कोयाळीतील स्नेहवन आश्रमशाळा, शेळपिंपळगाव येथील संपर्क मुलांचे बालग्राम वसतिगृह, जुन्नरमधील अण्णासाहेब आवटे निवासी वसतिगृह आणि शिक्रापूर येथील श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी विद्यालयात जॅकेटचे वाटप करण्यात आले. जुन्नरमधील माणिकडोह, गोद्रे आणि पाडळी येथील कातकरी पाड्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडमधील सुपे सातकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ह. भ. प. कोंडाजी बाबा डेरे वारकरी आश्रम आणि चावंड येथील अनुदानित आश्रमशाळेतील मुलांनाही या उपक्रमाचा लाभ मिळाला.
वाटपावेळी मुला-मुलींनी आणि संस्थांच्या व्यवस्थापनाने उपक्रमाचे कौतुक केले. आमदार लांडगे यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याची भावना आश्रम व्यवस्थापनाने व्यक्त केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त महिनाभर राबविण्यात येणाऱ्या रक्तदान व आरोग्य शिबिरे, इंद्रायणी नदी स्वच्छता मोहीम आणि दुष्काळग्रस्तांना मदत या उपक्रमांसोबत मोशीच्या युवकांनी यंदा मुलांच्या हिवाळ्यातील गरज लक्षात घेऊन जॅकेट वाटपाचा उपक्रम राबविला.
या उपक्रमात सचिन (पिंटू) काळुराम सस्ते पाटील, तुषार पाटीलबुवा सस्ते पाटील, मोशी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल काळुराम सस्ते पाटील, नितीन दाजी घिगे (हवालदार), प्रसाद जाधव, दत्तात्रय सस्ते, तुषार सस्ते, विशाल टेकाळे, पैलवान सचिन वहिले, सुनील काटे, विक्रम वहिले, प्रदीप पवार, गणेश घारे, दिनेश टेमकर आणि स्वप्नील भूमकर यांनी सहभाग घेतला.
*****
प्रतिक्रिया :
“आमदार महेशदादा लांडगे यांच्या ५१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड द्यावी, या भावनेतून मोशीतील आम्ही युवक एकत्र आलो. थंडीच्या दिवसांत गरजू मुला-मुलींना उपयोग व्हावा म्हणून आश्रमशाळा, वसतिगृहे आणि आदिवासी पाड्यांवरील शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन १,०५१ हिवाळी जॅकेटचे वाटप केले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून या प्रयत्नाचं समाधान मिळालं. ही मदत मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”
– सचिन (पिंटू) सस्ते पाटील, उपक्रम समन्वयक.
