परवानगीशिवाय रस्ता खोदल्याचा प्रकार उघड ! भांबुर्ड्यात महापालिकेचा दणका; २८.८५ लाखांच्या दंडाची कारवाईv
रस्ते खोदण्याचा मनमानी कारभार भोवला! भांबुर्ड्यातील कामावर महापालिकेची स्थगिती

पुणे | प्रतिनिधी – पुण्यातील भांबुर्डा, शिवाजीनगर परिसरात महावितरणची विद्युत केबल टाकण्यासाठी पुणे महापालिकेची आवश्यक पूर्वपरवानगी न घेता रस्ता खोदण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेच्या पथ विभागाने संबंधित काम थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बांधकाम विकास विभागाने संबंधित विकासकाला ‘स्टॉप वर्क नोटीस’ बजावली आहे.ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डचे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण यांनी पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली होती.
भांबुर्डा, शिवाजीनगर येथील कॅनॉल प्लॉट क्र. ४५८, सब प्लॉट क्र. ६६+६८ आणि सीटीएस क्र. १३१९/६६+६८ परिसरात ग्रोस्टोन व्हेन्चर्स एलएलपीमार्फत सुमारे ८० ते ९० मीटर लांबीचे रस्त्याचे खोदकाम करून महावितरणची केबल टाकण्याचे काम सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.या कामासाठी पुणे महापालिकेच्या पथ विभागाची आवश्यक पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. अनधिकृत खोदकामामुळे सार्वजनिक रस्त्याचे नुकसान होत असल्याने संबंधित केबल जप्त करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रस्त्याचे खोदकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याचे संबंधित पत्रात नमूद आहे. त्यानंतर पथ विभागाने सुमारे २८ लाख ८५ हजार ४०५ रुपयांची तिप्पट दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.याशिवाय, पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक ६ यांनी संबंधित विकासकाला बांधकाम थांबविण्याबाबत नोटीस बजावली आहे.
दंडाची रक्कम महापालिकेच्या कोषागारात जमा करून आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच पुढील काम सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे.या प्रकरणामुळे शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर विविध विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या खोदकामांसाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आणि नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
