Coronavirus: दिल्लीतील मरकजमधून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले दोघे करोना पॉझिटिव्ह

दिल्लीतल्या निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमातून शहरात दाखल झालेल्या दोन जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप १२ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून ३२ जण शहरात आले आहेत. पैकी २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, रात्री सहा जणांचा करोनाचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून आज दोन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आणखी काही जणांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यास घेऊन आल्याचं सांगितलं. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.