प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक भितीच्या सावटाखाली
महापालिका प्रशासन जागे कधी होणार? शिवसेना गटनेत्याचा सवाल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट, भटक्या कुत्र्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. कुत्र्यांची संख्या लाखाच्या पुढे असताना मागील पाच वर्षात केवळ ४३ हजार ६४४ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात प्रशासनाकडे यासंदर्भात कोणतीही अचूक आणि सुटसुटीत माहिती उपलब्ध नसून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन जागे कधी होणार आहे, असा सवाल शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी केला आहे.
गटनेते विश्वजीत बारणे म्हणाले, चिखलीतील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात मुलगा गंभीर जखमी झाली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्व निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची समस्या कायम असून मागील चार महिन्यात १३ हजार ६१५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. ३० ते ३५ लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्यक्षात एक लाखांपेक्षा अधिक मोकाट कुत्री आहेत. लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरीवस्ती भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांवर आणि लहान मुलांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत.
न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे आवश्यक असताना महापालिकेने केवळ एकच नसबंदी केंद्र उभारले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पुरेसे नसबंदी केंद्र उपलब्ध करण्यात महापालिका पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. महापालिका विविध कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत असताना, भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आणि नसबंदी मोहिमेसाठी बजेटमध्ये आवश्यक ती ठोस आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. रेबीज प्रतिबंधक लसी आणि इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, त्यांना पकडणे आणि नसबंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. महापालिका प्रशासन जागे कधी होणार, असा सवाल गटनेते बारणे यांनी केला आहे.
९० टक्के मोकाट कुत्री
शहरात केवळ १० टक्के पाळीव कुत्री असून ९० टक्के मोकाट कुत्री आहेत. हा आकडा चिंताजनक आणि भयावह आहे. नागरिक मोकाट कुत्र्याबाबत महापालिकेकडे तक्रारी करतात. परंतु, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. कुत्री पकडली जात नाहीत. पकडली तर दुसऱ्या भागात सोडून दिली जातात. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्कील झाले असल्याकडे गटनेते बारणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ टाकणाऱ्यांवर कारवाई करा
खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, तसेच रहिवासी कचराकुंडी, उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. त्यामुळे मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढताना दिसते. रात्रीच्या वेळी वाहने व पादचाऱ्यांवर कुत्री धावून जातात. कुत्रा अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वाहनचालक वाहन वेगात चालवितात. त्यामुळे अपघात होतात. रात्री अंधारात रस्त्यांवरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही बारणे यांनी केली.
