Wednesday, August 12, 2026
Latest:
पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा नागरिकांवरील हल्ल्यांचा धोका रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या कुत्र्यांकडून नागरिक, महिला तसेच लहान मुलांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडेच चिखली परिसरात एका लहान मुलीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी एकत्रितपणे हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. तसेच रावेत येथील सिटी प्राईड शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका महिला व मुलीचा दुचाकीच्या मागे पाठलाग करून त्यांना खाली पाडले व त्यांच्या कपड्यांना तोंडाने ओढण्याचा प्रयत्न केला. अशा घटना अत्यंत गंभीर असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


विशेषतः शाळा, उद्याने, सोसायट्या, बाजारपेठा तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या परिसरांमध्ये कुत्र्यांचे टोळकेच्या टोळके दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये आपल्या लहान मुलांना एकटे रस्त्यावर सोडावे की नाही, याबाबतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या समस्येकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे.


त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तातडीने दखल घेऊन संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे निर्बीजीकरण (ABC) तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर व प्रभावीपणे करावे. तसेच नागरिक व विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी.


शहरातील संवेदनशील ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, उद्याने व रहिवासी परिसरांमध्ये विशेष पथके नियुक्त करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी हेल्पलाइन व तातडीची प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी.


नागरिकांच्या जीविताची व सुरक्षिततेची जबाबदारी महानगरपालिकेची असून, या गंभीर प्रश्नावर कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.तरी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पशुवैद्यकीय विभागास आवश्यक त्या सूचना देऊन संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा धोका तातडीने कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, ही विनंती.