पिंपरी चिंचवडबातम्या

29 सप्टेंबर रोजी लाखोंचा ‘निर्धार मोर्चा’ मुंबईत धडकणार; आमदार अमित गोरखेंच्या नेतृत्वात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी निर्णायक एल्गार

पिंपरी चिंचवड, 26 सप्टेंबर 2026 : अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणात उपवर्गीकरण करून मातंग समाजासह इतर वंचित घटकांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी, या मुख्य मागणीसाठी आगामी 29 तारखेला मुंबईत  ‘निर्धार मोर्चा’ धडकणार आहे. आमदार अमित गोरखे यांच्या खंबीर नेतृत्वात काढण्यात येणारा हा मोर्चा वंचित घटकांचा अखेरचा आणि निर्णायक एल्गार आहे.

*राज्यभरात 75 हून अधिक मोर्चे*

आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा आणि गेली अनेक वर्षे अन्यायाचा सामना करणाऱ्या समाजाला न्याय मिळावा, यासाठी आतापर्यंत राज्यभरात 75 हून अधिक मोर्चे आणि आंदोलने यशस्वीपणे पार पडली आहेत. आता निर्णायक एल्गार म्हणून 29 तारखेला राज्याची राजधानी मुंबई येथे हा ऐतिहासिक निर्धार मोर्चा धडकणार आहे.

 “आरक्षणाचा मूळ उद्देश सर्वांचा सर्वांगीण विकास हा आहे. परंतु, अनुसूचित जातीच्या काही विशिष्ट घटकांना अद्यापही आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधींपासून कोणताही वंचित घटक दूर राहू नये, यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंत राज्यभर 75 हून अधिक मोर्चांच्या माध्यमातून आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे. 29 तारखेचा मुंबईतील ‘निर्धार मोर्चा’ हा आमच्या हक्काचा, अस्तित्वाचा आणि न्यायाचा अंतिम लढा आहे.” – आमदार अमित गोरखे

मोर्चाच्या प्रमुख मागण्या:

आरक्षण उपवर्गीकरण: अनुसूचित जाती जमाती आरक्षणात उपवर्गीकरण तात्काळ लागू करून मातंग व इतर वंचित समाजाला हक्काचा वाटा देणे.

शिक्षण व रोजगार: वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगारात समान संधी उपलब्ध करणे.

शासकीय नोकऱ्यांमध्ये न्याय: भरती प्रक्रियेत उपवर्गीकरणाच्या आधारे न्याय्य प्रतिनिधित्व देणे.

या ‘निर्धार मोर्चा’मध्ये राज्यभरातून मातंग, मादिगा, बुरूड, चर्मकार असे सर्व वंचित समाज घटक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. अन्यायाविरुद्ध आणि समान संधीच्या हक्कासाठी मुंबईत आझाद मैदानावर सर्व वंचित समाज लाखोंच्या संख्येने एकवटणार आहेत.