पिंपरी चिंचवडबातम्या

माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे उद्दिष्ट; १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार

पिंपरी, ता. २७ : माथाडी कामगारांच्या रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी (ता. २९) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे राज्यस्तरीय माथाडी पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील सहा हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी दिली.

काळेवाडी येथे रविवारी (ता. २७) आयोजित पत्रकार परिषदेत मोरे यांनी मेळाव्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी दोन वाजता मा. रवींद्रदादा चव्हाण यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

माथाडी संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी आगामी काळातील नियोजन, कामगारांच्या विविध समस्या, रोजगाराच्या संधी, कामगारांची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा तसेच कल्याणकारी योजनांबाबत मेळाव्यात विचारविनिमय केला जाणार आहे. कामगारांच्या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवरही चर्चा होणार आहे.

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे उद्दिष्ट

माथाडी संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक संघटनात्मक नियोजन, कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांबाबत महामेळाव्यात चर्चा होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

रोजगार महाकुंभातून युवकांना संधी

दरम्यान, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध नामांकित उद्योग व कंपन्यांचे प्रतिनिधी या रोजगार महाकुंभात सहभागी होणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पाचवी उत्तीर्ण उमेदवारांपासून उच्चशिक्षित युवकांपर्यंत पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेळाव्यात सहभागी होऊनही तत्काळ रोजगाराची संधी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.