‘अवकारिका’ चित्रपटाच्या निर्मात्याची खंत
“चित्रपटातून विचार मांडला, मैदानावर बदल घडवून दाखवला; तरीही प्रतिसादाची प्रतीक्षा का?”

‘अवकारिका’ चित्रपट बनवण्यामागे आमच्या मनात एक साधा प्रश्न होता. कचरा साफ करण्यासाठी अनेक हात काम करत आहेत; पण कचरा टाकणाऱ्या माणसाची मानसिकता बदलण्यासाठी आपण काय करतोय?
नद्या, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, रस्ते, नाले आणि आपल्या घराच्या आजूबाजूला पडलेला कचरा आपण रोज पाहतो. सफाई कर्मचारी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक तो साफ करतात. काही वेळाने त्याच ठिकाणी पुन्हा कचरा पडतो. हे पाहताना जाणवलं की, स्वच्छतेच्या कामाबरोबरच लोकांच्या सवयी आणि विचार बदलण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे.
यातूनच पाच मिनिटांच्या लघुपटाची कल्पना सुचली. पुढे विषय उलगडत गेला आणि त्यातून ‘अवकारिका’ हा पूर्ण लांबीचा चित्रपट आकाराला आला.
कचऱ्यासारख्या विषयावर चित्रपट बनवताना व्यावसायिक यशाची खात्री नव्हती. मात्र, चित्रपट मनोरंजक असावा, त्यातली गोष्ट लोकांना आपली वाटावी आणि चित्रपट संपल्यानंतरही तो त्यांच्या मनात राहावा, यासाठी आम्ही मनापासून काम केलं. प्रेक्षकांनी हसावं, भावूक व्हावं आणि स्वतःच्या वागण्याचा विचार करावा, ही आमची इच्छा होती.
आम्ही नेहमी म्हणतो, हा चित्रपट आम्ही बनवला, त्यापेक्षा निसर्गानेच आमच्याकडून बनवून घेतला.
मराठीत चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहिलेल्या प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची मांडणी, गाणी, संवाद आणि भावनिक प्रसंग लोकांच्या मनाला भिडले. अनेकांनी आवर्जून सांगितलं, “हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला हवा.” काहींनी चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःच्या सवयींमध्ये झालेला बदलही सांगितला. अशा प्रतिक्रिया ऐकताना आमच्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
‘Redbud Motion Picture’चा हा पहिलाच चित्रपट. आमच्याकडे मोठ्या बॅनरचं पाठबळ नव्हतं. आर्थिक साधनंही मर्यादित होती. अशा वेळी काही चांगली माणसं पुढे आली. त्यांनी विषयावर विश्वास ठेवला, आर्थिक सहभाग दिला आणि चित्रपट पूर्णत्वाला नेण्यासाठी साथ दिली. त्यांच्या विश्वासाबद्दल आम्ही कायम ऋणी आहोत.
चित्रपटाच्या संगीतानेही लोकांशी सुंदर नातं जोडलं. कैलाश खेर यांच्या आवाजातील गाण्यावर देशभरातून स्वच्छतेच्या रील्स तयार होताना दिसतात. भारतात स्वच्छता करणाऱ्या जपानी नागरिकांच्या व्हिडिओतही हे गाणं वापरलेलं पाहायला मिळालं. आपण मांडलेला विचार लोक स्वतःच्या कृतीशी जोडत आहेत, ही आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे.
या प्रतिसादामुळे आम्हाला वाटलं की, शासन आणि स्वच्छ भारत मिशनकडूनही या प्रयत्नाला प्रोत्साहन मिळेल. नागरिकांच्या वागण्यात बदल घडवण्याचा विषय असल्यामुळे चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा होती.
काही ठिकाणी चांगलं सहकार्य मिळालंही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेने चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मदत केली. त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.
केंद्राच्या स्वच्छ भारत मिशनपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. अनेक ईमेल आणि स्मरणपत्रांनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली. संबंधित अधिकाऱ्यांना विषय आवडला. लोगो आणि गीत वापरण्याची परवानगी मिळाली. चित्रपट हिंदीतही उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त झाली. त्यामुळे आम्हाला आणखी विश्वास आणि उभारी मिळाली.
हाच विश्वास घेऊन आम्ही चित्रपट हिंदीत तयार केला. विषय संपूर्ण देशापर्यंत पोहोचावा म्हणून आणखी वेळ, मेहनत आणि पैसा गुंतवला. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या व्यापक प्रसारासाठी अपेक्षित ठोस सहकार्य आणि पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. वारंवार ईमेल केले, स्मरणपत्रे पाठवली, दिल्लीला जाऊन भेटी घेतल्या. तरी पुढे काय होणार, याची स्पष्टता मिळालेली नाही.
खंत केवळ मदत मिळाली नाही याची नाही. खंत आहे ती आपल्या प्रयत्नांवर संवादही होत नाही याची.
आमच्या प्रस्तावात काही त्रुटी असतील, तर त्या सांगा. काही निकष पूर्ण करायचे असतील, तर ते कळवा. सहकार्य शक्य नसेल, तर तसं स्पष्ट उत्तर द्या. आम्ही तेही समजून घेऊ. पण उत्तरच मिळत नसेल, तर काम करणाऱ्या माणसाने पुढे कोणत्या दिशेने जावं?
मी आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान किंवा अक्षय कुमार नाही. माझ्यामागे प्रसिद्ध नावाचं वलय नाही. पण निर्मात्याचं नाव मोठं नाही म्हणून त्याने मांडलेल्या विषयाचं महत्त्व कमी होतं का? सामान्य नागरिकाने राष्ट्रीय हिताचा प्रयत्न केला, तर त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जावं, ही अपेक्षा चुकीची आहे का?
आमीर खान यांनीही विशेष प्रदर्शनात हा चित्रपट पाहिला आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की, चित्रपटाचा विचार त्याच्या आशयावर, गुणवत्तेवर आणि समाजासाठी असलेल्या उपयुक्ततेवर व्हावा.
या सगळ्या अनुभवांनंतरही आमची उमेद कमी झालेली नाही. चित्रपटातून मांडलेला विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही ‘माझं मैदान, स्वच्छ मैदान’ हा प्रकल्प सुरू केला.
पिंपरी चिंचवडमधील डॉ. हेडगेवार मैदानावर गेली दहा महिने सातत्याने काम केलं. नागरिकांशी संवाद साधला. मैदान आपलं आहे, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपली आहे, ही भावना रुजवली. लोक सहभागी होत गेले, त्यांच्या सवयी बदलत गेल्या आणि आज मैदान जवळपास ९९ टक्के स्वच्छ ठेवण्यात आम्हाला यश मिळालं आहे.
या कामात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोलाचं सहकार्य केलं. प्रायोजकांनी मदतीचा हात दिला. नागरिक सहभागी झाले आणि Avkarika Team सातत्याने काम करत राहिली. आज कुणीही मैदानाला भेट देऊन हा बदल पाहू शकतं.
लोकांची मानसिकता बदलली, तर सार्वजनिक जागा सातत्याने स्वच्छ राहू शकते, हे आम्ही प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे.
या प्रकल्पाचा अहवालही स्वच्छ भारत मिशनला सादर केला आहे. मात्र, त्यावरही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आश्चर्य आणि खंत वाटते. चित्रपटातून जनजागृती केली, मैदानावर उतरून त्याच विचाराचा परिणामही दाखवला. अशा प्रयत्नातून आणखी काय करता येईल, यावर किमान चर्चा तरी व्हावी, असं मनापासून वाटतं.
आम्ही पंतप्रधान कार्यालयालाही आमचं म्हणणं कळवलं आहे. करसवलतीबाबतही निवेदन दिलं आहे. त्यावर स्पष्ट प्रतिसादाची अपेक्षा आहे.
देशभर स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत. त्यामध्ये लोकांच्या सवयी बदलण्यासाठी ‘अवकारिका’सारखा चित्रपट आणि नागरिकांच्या सहभागातून उभा राहिलेला मैदानाचा प्रयोग उपयोगी पडू शकतो का, याचा गांभीर्याने विचार व्हावा. आमचं काम पाहावं, तपासावं आणि योग्य वाटल्यास त्याला व्यापक स्वरूप द्यावं.
पुढचा प्रवास कसा असेल, हे आज सांगता येत नाही. पण प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम, सहकाऱ्यांचा विश्वास आणि मैदानावर दिसणारा बदल आम्हाला पुढे काम करण्याचं बळ देत आहेत.
हा चित्रपट बनवण्याचा प्रवासही सोपा नव्हता. विषयाचं वास्तव आणि त्यातली भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही प्रत्यक्ष कचरा असलेल्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण केलं. मोशी कचरा डेपोमध्ये जवळपास साठ ते सत्तर जणांची टीम घेऊन शूटिंग केलं. अशा परिस्थितीत संपूर्ण टीमसह काम करणं, आवश्यक परवानग्या मिळवणं आणि चित्रीकरणाचं नियोजन करणं, हे मोठं आव्हान होतं. पण सफाई कर्मचाऱ्यांच्या जगण्याचं वास्तव आणि ते ज्या परिस्थितीत काम करतात, त्याची जाणीव पडद्यावर प्रामाणिकपणे यावी, यासाठी हे आवश्यक होतं.
त्याचवेळी चित्रपटाची दृश्यात्मक सुंदरता, संगीत आणि मनोरंजनमूल्य यांवरही तितकीच मेहनत घेतली. गाण्यांच्या चित्रीकरणासाठी दक्षिण भारतातील ठिकाणीही गेलो. विषय गंभीर असला, तरी चित्रपट पाहताना कुठेही रटाळ वाटू नये, त्याची मांडणी आटोपशीर आणि पकड घेणारी असावी, याची जाणीवपूर्वक काळजी घेतली. गोष्ट, संवाद, संगीत आणि दृश्यं यांतून प्रेक्षक चित्रपटाशी जोडला जावा, हा प्रत्येक टप्प्यावर आमचा प्रयत्न होता.
या मेहनतीचा परिणाम प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून जाणवला. त्यांना विषय समजला, गोष्ट भावली आणि त्यातल्या भावना मनाला भिडल्या. आमच्यासाठी हे समाधान खूप मोठं होतं.
आम्ही थांबलेलो नाही. उत्तराची वाट पाहतानाही आमचं काम सुरू आहे.
आमची विनंती एवढीच आहे. चित्रपट पाहा, मैदानावर झालेला बदल पाहा आणि या प्रयत्नावर संवाद साधा. स्वच्छ भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने योगदान देत आहोत. या योगदानाची दखल घेतली जावी, हीच प्रामाणिक अपेक्षा आहे.
