पिंपरी-चिंचवडमध्ये १० ठिकाणी होणार कचरा प्रक्रिया केंद्र; प्रस्तावित जागांची यादी जाहीर
मोशी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेचा विकेंद्रित कचरा व्यवस्थापनाचा आराखडा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येवर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील १० विविध ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मोशी कचरा डेपोवरील वाढता ताण कमी करून प्रभागनिहाय कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी आराखडा आखण्यात आला आहे.
मोशी येथील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात येत असून, घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याचे विकेंद्रित पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या विविध आरक्षित जागांची स्थळपाहणी करण्यात आली. प्राथमिक स्तरावर शहरातील दहा जागा प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यांच्या तांत्रिक व पर्यावरणीय बाबींची तपासणी सुरू आहे.
प्रस्तावित १० जागा अशा…
प्रभाग क्रमांक १३ – सेक्टर क्रमांक २२, पाण्याच्या टाकीजवळ
प्रभाग क्रमांक १७, चिंचवड – आरक्षण क्र. १/८९, सर्व्हे नं. ११३, ११४ व ११६ पैकी
प्रभाग क्रमांक १८, चिंचवड – आरक्षण क्र. २२१
प्रभाग क्रमांक १० – दत्तनगर, राम मंदिराजवळ
दिघी गायरान – सर्व्हे नं. ७७
चोविसावाडी – आरक्षण क्र. २/१६
पुनावळे – सर्व्हे नं. २३/६/३ पै., २३/६/२ पै., २३/५ पै., २३/१ पै., २३/६/४ पै., २३/२/१ पै. व २३/२/२
पुनावळे – सर्व्हे नं. २६/१/६, २६/३/१ व २६/३/२ पै.
गवळीमाथा येथील जागा
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रस्तावित जागा – याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काय सुविधा उभारल्या जाणार?
प्रस्तावित जागांच्या क्षेत्रफळानुसार तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या घनकचरा प्रक्रिया सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. यामध्ये दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशन, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, जैविक कचऱ्यापासून बायोगॅस आणि बायोफ्युएल निर्मिती तसेच प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्त उत्पादने तयार करण्याचे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
या सर्व जागांची तांत्रिक योग्यता, उपलब्ध क्षेत्रफळ, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणीय परिणाम आणि इतर आवश्यक निकषांच्या आधारे सखोल तपासणी करण्यात येत आहे. आवश्यक त्या संमती व मान्यता मिळाल्यानंतर अंतिम जागा निश्चित केली जाणार आहे.
महापालिकेच्या या विकेंद्रित कचरा व्यवस्थापनामुळे कचऱ्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होईल, मोशी कचरा डेपोवरील भार कमी होईल आणि शहरातील घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत आहे. प्रस्तावित जागांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर अंतिम निश्चिती महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नगरसदस्य यांच्या संमतीने केली जाईल. पर्यावरणपूरक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने हे प्रकल्प उभारण्यात येतील.
तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी प्रत्येक प्रस्तावित जागेची तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी सुरू असल्याचे सांगितले. सर्व संबंधित बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
