SSC Result : यावर्षीही मुलींचीच बाजी
SAKHI NEWS LIVE:-
करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान, या mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.inया अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे. तर यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली आहे.
यंदा एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहवीची परीक्षा दिली होती. यामध्ये विद्यार्थी – ९ लाख ७५ हजार ८९४, विद्यार्थिनी – ७ लाख ८९ हजार ८९४, तृतीयपंथी विद्यार्थी – ११०, अपंग विद्यार्थी – ९ हजार ४५ यांचा समावेश आहे. तर, संवेदनशील केंद्रांची संख्या ८० होती. १५ दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
मुलींचीच बाजी
यंदाही दहावीच्या परीक्षेत निकालात मुलींनीच बाजी मारली. मुलींचा एकूण निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के इतका लागला आहे. दरम्यान, निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात सर्वात कमी लागला आहे.