गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मराठी पक्की, तर इंग्रजी कठीण नाही!’’

SAKHI NEWS LIVE:-

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘घरातली भाषा आणि शाळेची भाषा एक असली की अभ्यास सोपा होतो. पण त्याच वेळी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा असा भेद करून मुलांच्या चुका काढण्यावर भर देऊ नये. त्याऐवजी मुलांची भाषा समजून घेऊन ती प्रमाणभाषेशी जोडून घेतली गेली पाहिजे. अशा रीतीनं मराठी भाषा पक्की झाली, तर इंग्रजी शिकणं मुळीच कठीण जाणार नाही.’’ सांगताहेत मानसोपचारतज्ज्ञ आणि अभ्यासविषयक प्रशिक्षक अरुण नाईक मुलाखतीच्या या दुसऱ्या भागात.

प्रश्न: इंग्रजीकडे  बघण्याचा पालकांचा दृिष्टकोन कसा असतो?

अरुण नाईक : अस्खलित इंग्रजी न येणाऱ्या काही पालकांना वाटतं, की आपण मराठी माध्यमातून शिकल्यामुळे आपल्यालाओघवती इंग्रजी येत नाही. हे टाळण्यासाठी ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. पण ती का येत नाही? याचं कारण शोधलं तर असं लक्षात येतं, की त्यांच्या काळीसुद्धा शाळेत भाषा ज्या पद्धतीनं शिकवली गेली पाहिजे तशी ती शिकवली गेलेली नाही. आपल्याला माहीत आहे, की आपण आपली मातृभाषा शाळेत जायच्या आधी बोलायला लागलो होतो. आज एखाद्या लहान मुलाच्या अवतीभवती चार-पाच भाषा बोलल्या जात असतील तर ते मूल त्या चार-पाच भाषा बोलू शकतं. हे कसं शक्य होतं ते लक्षात घेऊया. भाषा शिकण्याचे चार टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे श्रवण- म्हणजे ऐकून शिकणं. दुसरा टप्पा- संभाषण म्हणजे बोलून शिकणं. जे ऐकतो ते बोलतो. मग तिसरा टप्पा आहे तो म्हणजे वाचन, कारण त्यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि लेखन हा चौथा टप्पा आहे. पण आपलं काय झालं, तर आपण नेमकं उलट केलं. आपण इंग्रजी भाषा शिकायची सुरुवात लेखनापासून केली. पहिले टप्पे पार केलेच नाहीत. मी शब्द, त्यांची स्पेलिंग्ज आणि अर्थ शिकलो, पण मला त्या शब्दांचा वाक्यामधला वापर कळलाच नाही. म्हणून बोलण्याचा सराव झाला नाही आणि संभाषणात्मक इंग्रजीमध्ये माझी अडचण झाली. हे मूळ कारण न कळल्यामुळे पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं. त्यामुळे मुलांना संभाषणात्मक इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास आला तरी ती संकल्पनात्मक पद्धतीनं मांडता येऊ लागली का? तर नाही. कारण इंग्रजीतून अभ्यास केला तरी इंग्रजीतून विचार मांडता येणं, व्यक्त होता येणं, हे झालं नाही. ज्या मुलांना ती भाषा आत्मसात करता आली ते महाविद्यालयात गेल्यावर जुळवून घेऊ शकले. पण बहुतांश मुलांना- मग त्यांचं माध्यम कोणतंही असो, अडचण आली. त्यामुळे भाषा शिकवण्याच्या पद्धतीत बदल होणं गरजेचं आहे. एक भाषा चांगली शिकली जाते तेव्हा दुसरी कोणतीही भाषा शिकणं सोपं जातं. जेव्हा एका भाषेचे बारकावे, त्यातलं सौंदर्य समजायला लागतं, तेव्हा दुसऱ्या भाषेतलं सौंदर्य समजणंही सोपं जातं.

प्रश्न: यासाठी शालेय स्तरावर भाषा कशी शिकवली गेली पाहिजे?

अरुण : कोणताही अभ्यासक्रम हा एकावर एक असा रचलेला असतो, आणि त्याची काठिण्य पातळी व खोली वर्षांनुरूप वाढवत नेलेली असते. मूर्त ते अमूर्त संकल्पना समजण्यासाठी शालेय स्तरावर सहावी-सातवीपर्यंत मुलांच्या भाषेच्या विकासावर भर देणं गरजेचं आहे. भाषा ही मनातले विचार, संकल्पना व्यक्त करण्यासाठी असते, हे लक्षात घेऊन शालेय शिक्षणात भाषेच्या लिपीबरोबरच विचार करणं व ते मांडता येणं, याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तसंच दर दहा कोसांवर भाषा आणि बोलण्याची पद्धत बदलते. मुलं घरात भाषा ऐकून बोलायला शिकतात. शाळेतली प्रमाणभाषा  अनेक  मुलांसाठी त्यापेक्षा खूप वेगळी असते. पण बोली भाषा अशुद्ध आणि प्रमाणभाषा शुद्ध मानून या मुलांना कमी लेखू नये. तुम्ही कच्चे, मागासलेले, असं दाखवून त्यांचं खच्चीकरण होता कामा  नये. कारण यातून न्यूनगंड निर्माण होतो. शिक्षणातून असा न्यूनगंड तयार न होता आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. बोली भाषा बोलणाऱ्या मुलांना प्रमाण भाषेशी जोडून घ्यायला मदत करायला हवी.

प्रश्न: हे कसं करता येईल?

अरुण : या संदर्भात न्यूझीलंडमधल्या सिल्व्हिया अ‍ॅपस्टर या शिक्षिकेचं ‘टीचर’ हे पुस्तक वाचलं पाहिजे. तिथल्या शाळेतली ‘माओरी’ या आदिवासी जमातीतील मुलं परीक्षेत नापास होत असत. सिल्व्हियाला यामागचं कारण भाषा आहे हे लक्षात आलं. त्या मुलांना इंग्रजी पुस्तकातलं वातावरण, शब्द, काहीच परिचयाचं नसल्यामुळे ती त्या गोष्टींशी स्वत:ला जोडून घेऊ शकत नव्हती, ती भाषा आत्मसात करू शकत नव्हती, आणि परिणामी त्यांच्यावर ‘नापास’चा शिक्का बसत होता. एकाच इयत्तेत दोन-तीन वर्षं घालवून ही मुलं पुढे जाईपर्यंत मोठी झालेली असत. मग वर्गात वयानं लहान असणारी, चांगलं इंग्रजी बोलणारी गोरीगोमटी युरोपियन मुलं बघून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होत असे, आणि ती सातवीतच शाळा सोडून देत असत. ही गळती थांबवण्यासाठी सिल्व्हियानं माओरी मुलांना इंग्रजी भाषा कळावी यासाठी नवीन तंत्र विकसित केलं. तिनं त्यांच्या अनुभवातील, वातावरणातील शब्दांतून इंग्रजी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचवली. उदाहरणार्थ- तिनं मुलांना कशाची भीती वाटते ते विचारलं. एक मुलगा पोलिसांची भीती वाटते, असं म्हणाल्यावर तिनं त्याचं कारण विचारलं. मग त्याच्या उत्तराच्या अनुषंगानं तिनं मारणे, पळणे हे शब्द शिकवून ते त्यांच्या परिचयाचे केले. असं जाणीवपूर्वक भान ठेवून भाषेसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. सिल्व्हियानं माओरी मुलांच्या अनुभवविश्वाचा वापर करून पुस्तकं तयार केली. आपल्याकडे ‘कोरकू’ या आदिवासी भाषेत पुस्तकं लिहिली जात आहेत. असे प्रयत्न आणखी मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवेत.

प्रश्न: बोली भाषेत शैक्षणिक पुस्तकं लिहिली जाणं हे उत्तम आहेच. परंतु मग ही मुलं इंग्रजी भाषा कशी शिकतील?

अरुण : मी तुम्हाला नवी मुंबईतल्या ऐरोलीमधल्या एका  महानगरपालिकेच्या शाळेचं उदाहरण देतो. या शाळेतल्या मुलांना गणित शिकवण्याच्या ध्येयानं रुपेश जेसोटा काम करतो आहे. तो त्यांना गणितातली आयती उत्तरं न देता ती शोधायला लावतो, कारण त्याला या मुलांना गणिती पद्धतीनं विचार करायला शिकवायचं आहे. कधी तो गणिताशी संबंधित इंग्रजी भाषेतले व्हिडीओ त्यांना दाखवतो. इंग्रजी भाषेचं फारसं वातावरण नसलेली ही मुलं व्हिडीओ बघताना जेव्हा अडखळतात, आणि आम्हाला हे कळलं नाही म्हणतात, तेव्हा तो त्यांना ‘परत लावून बघूया’ म्हणतो, आणि समजेपर्यंत परत परत व्हिडीओचा तो भाग लावतो. मग ती मुलं नीट लक्ष देतात आणि त्यात काय म्हटलं असेल याचा विचार करत व्हिडीओ समजून घेतात. एकमेकांशी बोलून चर्चा करतात, डोक्यात पक्कं करत जातात, आणि या प्रक्रियेतून शिकत जातात. म्हणजे मुलांमध्ये ही क्षमता आहे. पण आपण त्यांना विचार करायची, या प्रकारे चर्चा करून शिकण्याची संधीच देत नाही. यातून आपल्याला कळतं, की जर अशी सवय लागली तर मुलं नवीन असलेली भाषासुद्धा शिकू शकतात. म्हणून जर एक भाषा व्यवस्थित तयार झाली, तर पुढे इंग्रजीतून शिकताना फारसं अवघड जाणार नाही.

प्रश्न: मग शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं? आणि का?

अरुण: शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच असावं, कारण त्या भाषेचे शब्द आपल्याला आधी माहीत असल्यानं त्यातून आपल्याला परिसराचं ज्ञान चांगलं होतं. त्यामुळे संकल्पनांकडे जाणं जास्त सोपं होतं. पण त्याच वेळी आपण बोलीभाषा ही सुद्धा एक भाषा आहे, प्रमाणभाषेची गरज ही लिखाणाच्या वेळी लागते, याचं भान ठेवून शिकवणं महत्त्वाचं आहे. आपण शिक्षण देताना चुका काढण्यावर भर देतो. त्याऐवजी मुलांची भाषा समजून घेऊन प्रमाणभाषेशी ती भाषा जोडून घेतली गेली पाहिजे. ते जर झालं, तर एक भाषा पक्की झाल्यानं दुसरी भाषा शिकणं फारसं कठीण जात नाही. मग मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं तरी इंग्रजी भाषा आत्मसात होणं अवघड होत नाही. घरातली भाषा आणि शाळेची भाषा एक असली की अभ्यास सोपा होतो.

प्रश्न: तुम्ही मुलांसाठी अभ्यासविषयक कार्यशाळा घेता. त्या संदर्भात मराठी आणि इंग्रजी माध्यमातल्या मुलांबद्दल काही तुलनात्मक निरीक्षणं आहेत का? अभ्यासाचा ताण, अडचणी, इत्यादींविषयी?

अरुण: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना जर ती भाषा आत्मसात करणं जमत नसेल तर त्यांना अभ्यास करणं अवघड जातं. त्या मानानं मराठी माध्यमातली मुलं चांगल्या स्थितीत असतात, कारण ती भाषा त्यांच्या ओळखीची असते. प्रथम आपली भाषेशी, शब्दांशी ओळख झाली की मग आपण अक्षरांकडे येतो. कारण ती आपल्याला लिहिण्या-वाचण्यासाठी लागतात. अक्षरं म्हणजे आपल्या उच्चारांची चित्रलिपी. हे जर समजावून सांगितलं तर अक्षरं, शब्द यांच्याशी मैत्री होते. ती मैत्री झाली की मग आपल्याला वाचावंसं वाटतं. वाचनाची सवय आपल्याला समृद्धतेकडे नेते. त्यामुळे वाचनाची सवय निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित झाली आहे त्यांना अभ्यासात कमी अडचणी येतात.

प्रश्न: मुलांच्या शिक्षणाचा, माध्यम निवडण्याचा निर्णय सर्वस्वी पालकांचा असतो. तुम्ही या बाबतीत पालकांना काय मार्गदर्शन कराल?

अरुण: आजचे पालक गोंधळून जाण्याचं एक कारण आहे ते म्हणजे शैक्षणिक संस्था खूप मोठय़ा प्रमाणावर जाहिराती करत आहेत. आज शिक्षण ही एक विक्रीयोग्य गोष्ट म्हणून पाहिली जाते, आणि ती विकत घेण्यामागे ‘स्टेटस्’ नावाची गोष्ट आली आहे. अशा वेळी पालकांनी शांतपणे स्वत:चा आणि मुलांचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. बदली होणाऱ्या, तसंच जगभर काम करणाऱ्या पालकांनी बदलीनंतरही मुलांचं शिक्षण सुरू राहील अशा शिक्षण मंडळाची (बोर्डाची) निवड केली पाहिजे. पण एकाच ठिकाणी राहणाऱ्या पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिकण्याची संधी दिली पाहिजे. दहावीनंतर ती जगभरात कुठेही गेली तरी अभ्यासक्रम पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली असेल. जरी पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरी ते मुलांमध्ये मराठी भाषेचा विकास घडवून आणू शकतात. त्यासाठी पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे.

पु. ल. देशपांडे परदेशातील एका भाषणात म्हणाले होते, की तुमच्या मुलांना इथल्या भाषेतलं उत्तम साहित्य वाचण्याची, इथल्या उत्कृष्ट कलांचा आस्वाद घेण्याची सवय लावा. भाषा फक्त शिक्षणाचं माध्यम म्हणून बघता कामा नये. म्हणूनच भाषेच्या विकासाकडे जर पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष दिलं, तर ते मूल कोणत्या माध्यमात शिकतं आहे यानं फारसा फरक पडत नाही. हे भान पालकांमध्ये येणं गरजेचं आहे.