दिव्यांग भवन फाउंडेशनच्या द्विवार्षिक विशेषांकाचे प्रकाशन
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेचे निरंतर प्रयत्न; महापौर रवी लांडगे यांची ग्वाही

“पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन हे एकाच छताखाली विविध थेरपी आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देणारे हक्काचे ठिकाण ठरले आहे. दिव्यांगांना बळ देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांग भवनच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या कार्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास मी सदैव तत्पर आहे,” अशी ग्वाही महापौर रवी लांडगे यांनी दिली.
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या द्विवार्षिक विशेषांकाचे प्रकाशन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मंगळवारी दिव्यांग भवन, पिंपरी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, व्यवस्थापक परेश गांधी, मानसशास्त्रज्ञ अपर्णा चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग भवनचे कार्य अनुकरणीय
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “दिव्यांग भवन हे केवळ सेवा देणारे केंद्र नाही, तर दिव्यांगांच्या विचारांना आणि आकांक्षांना दिशा देणारे व्यासपीठ आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी दिव्यांग भवनचे कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांग भवनचे हे मॉडेल राज्यातील इतर महानगरपालिकांसाठीही मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरेल.”
शुभेच्छा संदेश प्रेरणादायी
व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “या द्विवार्षिक विशेषांकासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दिव्यांग विभागाचे कल्याण मंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडून मिळालेले शुभेच्छा संदेश हे दिव्यांग भवनच्या कार्याची दखल घेणारे आहेत. हे संदेश दिव्यांग भवन आणि संपूर्ण टीमसाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत.”
दिव्यांग व्यक्तींना आवश्यक थेरपी, पुनर्वसन आणि विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग भवनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. विशेषांकाच्या माध्यमातून दिव्यांग भवनच्या कार्याची माहिती तसेच दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
