*वारी चुकवायची नाही*अमित दीक्षित उपअभियंता, pcmc

वारी चुकवायची नाही
अमित दीक्षित
उपअभियंता, pcmc
पिंपरी प्रतिनिधी
सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
खर तर माझ्याकडून या वर्षीची पंढरपुरवारी होण्याची शक्यता फारच कमी होती. पाऊस असल्यामुळे स्वता:मधील सायकलीस्ट बाजूला ठेवून बॉडीबिल्डर बाहेर आलेला असल्यामुळे सायकल चालवण्याची कुठलीच तयारी नव्हती. एव्हाना IAS तसेच इतर सायकलिंग ग्रुपने या वर्षीची सायकल वारी केव्हाच पूर्ण केलेली होती. दरवर्षी इतर ग्रुप ज्या दिवशी जाणार त्याच दिवशी मी,मयूर व रोहन सायकलवारी करत असत पण मागील वर्षी रोहन आला नाही व या वर्षी मयूर ने देखील रनिंग ची तयारी करत असल्यामुळे नकार दर्शविला. माझही काही ठरत नव्हता कारण एका दिवशी सुमारे 230 किमी म्हणजे 10 तास सायकल चालवायची असेल तर आठवडा भर तरी तयारी पाहिजेच. पण पांडुरंगा बद्दल असलेली आत्मीयता बैचेन करत होती. वारी चुकवायची नाही असा सारखा मनातून एक साद ऐकू येत होता. बर एकटा जायचा तर रिटर्न येण्याचा बॅकअप प्लॅन पण पाहिजे. घरी बायकोशी चर्चा केली तर बायकोचे म्हणणे झाले की तयारी नसेल आणि जायची इच्छा असेल तर कार घेवून जा. कारने केला जातो तो प्रवास असतो वारी नाही हे मी तिला सांगितले. मग मागच्या आठवड्यात शनिवारी म्हणजे 6 तारखेला जायचे ठरवले पण बॅकअप साठी कोणी उपलब्ध नव्हते. माझा दादा शनिवारी त्याला काम असल्यामुळे रविवारी जावू असा म्हणाला पण मला रविवारी जाणे शक्य नव्हते कारण लगेच सोमवारी ऑफिसला जाणे शक्य होत नाही, कमीत कमी 1 दिवस रेस्ट पाहिजे ना राईड नंतर. आता आषाढी च्या अगोदरचा एकच शनिवार शिल्लक होता मग बॅकअप साठी सागरला विचारणा केली पण त्याला काम असल्यामुळे शक्य होणार नव्हते, मग किरण ला विचारले तर त्याने यायला तयारी दर्शविली. 13 तारखेला जायचे नक्की झाले. सध्या जिम दररोज सुरू असल्याने सायकल तशीच बाल्कनी मध्ये धूळ खात पडली होती. प्रॅक्टिस शिवाय राईड होणार का पूर्ण हा प्रश्न होताच. गुरुवार पासून पाऊस देखील सुरू झाला होता. त्यात शुक्रवारी लेग मारताना लोअर बॅक चा स्नायू दुखावला आणि त्याच्या प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या. या दुखापतीमुळे सायकल चालवता येईल की नाही असे वाटू लागले. पण मनात म्हटले कदाचित पांडुरंग आपली परीक्षा पहात असेल. मग काय किती जरी त्रास झाला तरी वारी करायचीच असा निश्चय पक्का केला. शेवटी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. शुक्रवारी सायंकाळी ऑफिसवरुन घरी आल्यानंतर पहिल्यांदा सायकल पुसणे, त्यात हवा भरणे, चैन ल्युब लावणे, लाइट चार्ज करणे ही सर्व कामे करून घेतली, सगळे सागरसंगीत होऊन झोपायला 12 वाजले, एक भीतीयुक्त उत्साह जाणवत होता त्यामुळे शांत झोप लागलीच नाही, पहाटे 4 चा अलार्म खणाणला आणि ताडकन उठलो, पहिल्यांदा बाल्कनी मधून पावसाचा आढावा घेतला, बाहेर पाऊस तर काय पडत नव्हता, सगळी आवराआवरी करुन बरोबर 5 वाजून 10 मिनिटांनी घर सोडले, बॅक प्रचंड दुखत होती. अशातही नॉन स्टॉप सायकल चालवून पाटस टोल नाका येथे 3 तास 10 मिनिटात पोहोचलो तेव्हा खूप दिवसानी सायकल हातात घेतली असली तरी “मैने पहलवानी जरूर छोडि है पर लढना नही भुला” या सुलतान पिक्चरमधील डायलॉगची आठवण झाली. पण लगेचच हिरमोड झाला कारण सायकल वरुन खाली उतरलो तर सरळ उभेच राहता येईना. सरळ उभा राहण्याचा प्रयत्न केला तर बॅक मधून प्रचंड कळा येत होत्या. तेव्हा शेजारी असलेल्या एका चहाच्या दुकानात मांडलेल्या खुर्चीवर थोडा वेळ बसुन एक चिक्कीचे पाकीट संपवले. पाऊस जरी नसला तरी ढगाळ वातावरण असल्यामुळे घामाने पुरता न्हाऊन निघालो होतो. 15 मिनिट थांबून मग त्याच हॉटेल च्या आतल्या बाजूला भुजंगासन, कॅट कॅमल केले, तेव्हा कुठे सरळ उभारू शकलो, पुन्हा राईड सुरू केली व बरोबर 10:20 ला भिगवण येथे पोहोचलो. भूक लागली होती म्हणुन सायकल वरुनच एका हॉटेल मालकाला काय खायला आहे ते विचारल, मग इडली हा मेनू फायनल करून सायकल वरुन उतरून पुन्हा 4-5 वेळा भुजंगासन केले, नाश्ता करून पुन्हा राईड resume केली, वाटेत छोट्या छोट्या दिंड्या आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाताना दिसत होता. त्यांचे भजन, गाणी, उत्साह हा आनंद द्विगुणित करणारा होता. मी देखील एका दिंडी सोबत “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल” म्हणत एक छोटा selfie विडिओ काढला. वाटेत एका मोराचे मनमोहक दर्शन देखील झाले. वाटेत किरण फोन करून माझ्या लोकेशनची माहिती घेत होता. अधूनमधून बायको तसेच भारत, सागर, पंकज यांचे फोन येत होते. त्यांच्याशी बोलत कधी उजनी धरण गाठले समजलेच नाही. उजनी धरण म्हणजे माझ्यासाठी अगदी लहानपणा पासूनचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याची विशालता पाहून civil engineer असण्याचा अभिमान वाटतो. थोडा थांबून एका बाइकस्वाराला विनंती करून स्वताचे फोटो काढून घेतले. नंतर टेंभुर्णी येथे दुपारी 1:40 ला हॉटेल जगदंबा प्युअर वेज येथे जेवायला थांबलो. इथे जेवण्याचे मुख्य कारण म्हणजे इथली अप्रतिम अशी बाजार आमटी. मेनु कार्ड न बघता एक बाजार आमटी, एक ज्वारी भाकरी व ताक असा मेनू सांगून टाकला. मस्त 2 बाउल आमटीवर ताव मारला. भुजंगासन व थोडी स्ट्रेचिंग करून परत राईड सुरू केली, जेवण केल्यामुळे energy लेवल वाढली होती. मग काय फास्ट सायकलिंग सुरू केली, वाटेत अहमदनगर चे 4-5 cyclist दिसले. त्यांच्याशी हाय बाय करून पुढे निघालो. हायवेवरुन उजव्या हाताला पंढरपुर रोडला वळलो. आता रस्ता छोटा होता आणि वाटेत बर्‍याच दिंड्या चालल्या होत्या, सायकल असल्याने त्यांच्या शेजारून अगदी छोट्या जागेतून वाट काढत जायला मला शक्य झाले पण करकंब जवळ निवृत्ती महाराज यांची मोठी दिंडी होती जवळपास 8 te 10 हजार लोक असतिल त्यांनी पूर्ण रस्ता व्यापून टाकला होता व दोन्ही बाजूच्या गाड्या जागेवरच थांबून होत्या, पण मी पण एक वारकरीच असल्याने मला जायला रस्ता मिळत गेला, मी हळू हळू पुढे सरकत सुमारे अर्ध्या तासात केवळ 3 किमी अंतर कापून पुढे निघून आलो. मग पुन्हा सुसाट. पंढरपुर च्या अलीकडे 5 किमी वर एका ट्रस्ट चे भक्त निवास आहे. तेथे विठुरायाची एक भव्य मूर्ती स्थापलेली आहे. या ठिकाणी थांबून फोटो नाही काढले तर आम्हा सायकल स्वारांची वारी पूर्ण होत नाही. ती अशी जागा आहे की तिथे कुणालाच थांबण्याचा मोह आवरत नाही. तिथे श्रीगोंदे येथून आलेले काही सायकलस्वार फोटो सेशन करतच होते. मग त्यातील एकाला माझे फोटो काढण्याची विनंती केली. त्यांनी देखील विनंतीस मान देवून विविध पोझ मध्ये फोटो काढले. तिथे काही cyclists सोबत चर्चा केली तर असे कळाले की मंदिरापर्यंत सायकल घेवून जायला परवानगी दिली जात नाही. गर्दी खूप असल्यामुळे पांडुरंगाच्या मुख्य मूर्तीचे दर्शनासाठी सुमारे 7 तास लागणार असल्याने कमीत कमी नामदेव पायरी चे तरी दर्शन घ्यायचेच होते मला. मग ठरवले की काहीही झाल तरी सायकल घेऊनच जायचे तिथे आणी शेवटच्या 5 किमी साठी सायकल वर पुन्हा स्वार झालो. वाटेत चंद्रभागा वरील पूल लागला अतिशय निर्मळ अशी वाहणारी चंद्रभागा पाहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे 1 selfie घेतला आणि पुढे निघालो. गर्दी असल्याने वाहतुकीत बदल करणेत आलेले होते. त्यातून रस्ता शोधत मंदिराच्या दिशेने जात होतो, कुठेही अडवणूक झाली नाही हे महत्त्वाचे. मंदिराचा कळस दिसायला लागला तसा हुरूप आणखीनच वाढला होता. सायकल थेट मंदिराच्या समोर नेली, तिथे बरीच लोक फोटो काढण्यासाठी व्यग्र होते. तिथे एका मेजरशि बोलणे करून सायकल लावली व नामदेव पायरीचे दर्शन घेतले. नंतर गर्दी मध्ये मंदिरासमोर उभे राहून फोटो काढले. एव्हाना किरण देखील इंदापूर पर्यंत कारने पोहोचला होता, तो येईपर्यंत 5 किमी मागे असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळ थांबलो. तिथल्या lawn वर स्ट्रेचिंग करून मस्त ताणून दिली. थोड्याच वेळात किरण आला व आम्ही येतानाचा प्रवास कार ने केला.
काहीहि झाल तरी वारी चुकवायची नाही हेच लक्ष्य ठेवले होते आणि ते पूर्ण केल्याचे समाधान मिळाले.