बातम्या पिंपरी पालिकेची पर्यावरण विकास कार्यशाळा, विकास कक्षाची स्थापनाSakhi news livesayali kulkarni June 22, 2023June 22, 2023 Editor पिंपरी- औद्योगिक नगरी तसेच क्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरी चिंचवड शहराला भविष्यात पर्यावरणपुरक आदर्श शहर म्हणून ओळख मिळावी याच हेतूने शाश्वत विकास कार्यशाळा घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शाश्वत विकास कार्यशाळेचे आयोजन वाकड येथील हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल येथे करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.या कार्यशाळेस आमदार उमा खापरे, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, बाळासाहेब गलबले, मनोज सेठिया, प्रमोद ओंभासे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त अजय चारठाणकर, विठ्ठल जोशी, सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, विविध विभागांचे विभागप्रमुख, क्षेत्रिय अधिकारी, शाखाप्रमुख तसेच जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पॅलेडियम कन्सलटिंग इंडिया प्रायव्हेट लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पतजोशी, सी. एस. आय. आर. कंपनीचे राकेश कुमार, पुणे नॉलेज क्लस्टरच्या सी. ओ. ओ. डॉ. प्रिया नागराज, सी. ई. पी. टी. चे मुख्य डॉ. दिनेश मेहता, आय. एफ. सी. चे मोहित गणेरीवाला, ज्ञानप्रबोधिनीचे एन. डी. सावंत, सी. पी. सी. व्ही चे क्षेत्रिय संचालक भरत शर्मा, जे. आय. झेड कंपनीचे पर्यावरण तज्ञ सिद्धांत मन्होत्रा, मानदेशी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना सिन्हा उपस्थित होते.भारताचे झपाट्याने शहरीकरण होत आहे, लोक मोठ्या प्रमाणावर चांगल्या रोजगारासाठी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराला पायाभूत सुविधांची गरज आहे आणि शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करून संतुलित मार्गाने विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर धोरण 2030 च्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या विविध बाबींवर काम करण्यासाठी प्रशासकीय संरचनेत शाश्वत विकास कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण, हरितीकरण, जैवविविधता, घनकचरा, आरोग्य,वाहतूक, एनर्जी कार्बन एमिशन, क्लायमेट चेंज सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकोसिस्टीम, ग्रीन बिल्डींग, नदी पुनरुज्जीवन, जलस्त्रोत पुनरुज्जीवन आदी घटकांचा विचार करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. तसेच या अनुषंगाने भविष्यात राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहितीही त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून या शहरात राहत आहे. या शहराचा विकास होताना मी पाहिले आहे. महापालिका शाश्वत विकास कक्षाच्या माध्यमातून आदर्श शहराच्या विकासासाठी काम करीत असून लोकप्रतिनिधी या माध्यमातून महापालिकेस या स्तुत्य उपक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे आमदार उमा खापरे म्हणाल्या.ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांनी मनोगतामध्ये लोकसंख्यावाढ, पाणी टंचाई, शहरी समस्या, प्रदूषण याबाबत उद्भवणार्या भविष्यातील समस्यांबाबतीत आपले मत व्यक्त केले. महापालिका शाश्वत विकास कक्षाच्या माध्यमातून वेळेत करत असलेली उपाययोजनेबाबत समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यशाळेत सहभाग घेतला. तसेच शाश्वत विकास कक्षाबाबत मार्गदर्शनही केले. पर्यावरण तज्ञ आणि व्याख्याते डॉ. राकेश कुमार यांनीही आजच्या कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.शाश्वत विकासाच्या वेबसाईटचे उद्घाटन आमदार उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेला महापालिका अधिकार्यांसमवेत 150 पेक्षा जास्त सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.शाश्वत विकास कक्षाची स्थापना ही मुख्यत्वे पर्यावरण संवर्धन, शाश्वत वाहतूक आणि हवा गुणवत्ता, शाश्वत शहराची रचना, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक विकास, शाश्वत वित्त आणि नावीण्यपुर्ण उपक्रम या सहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी करण्यात आलेली आहे.भारताचे झपाट्याने नागरीकरण होत आहे, जिथे लोक मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या चांगल्या संधी, शिक्षण आणि आरोग्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. सध्या, भारतातील 34% लोकसंख्या शहरी भागात राहते आणि ती 2035 पर्यंत 43.2% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येच्या वाढीचा असाच काहीसा आलेख दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहर हे एक औद्योगिक शहर आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 17.27 लाख होती, 2023 मध्ये अंदाजे 23.81 लाखांवर पोहोचली आहे आणि 2030 पर्यंत ती 30 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.शहरांमधील वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांच्या गरजा वाढत आहेत आणि जर नियोजनबद्ध आणि कार्यक्षमतेने निरीक्षण केले नाही तर यामुळे पर्यावरणाचा र्हास, वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या अनुषंगाने पुर्वतयारी करण्याच्या दृष्टीकोणातून महापालिका शाश्वत विकास कक्ष स्थापन करीत आहे. भारताने जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, आपल्या देशाच्या मुख्य घटकांपैकी एक असलेल्या शाश्वततेवर लक्ष केंद्रिय केले आहे. महापालिका आपल्या कार्यक्षेत्रात सर्वांगीण विकास सुनिश्चित करून टिकावू उपक्रमांना बळकट करण्याच्या उद्देशाने वाटचाल करत आहे. पिंपरी चिंचवड शहर धोरण 2030 विचारात घेऊन उद्दिष्ट आर्थिक विकास, सामाजिक समता आणि पर्यावरण संरक्षण या तीन पैलूंमध्ये शाश्वतता उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहेत.या कार्यशाळेत पिंपरी चिंचवड शहर पर्यावरणपुरक शहर करण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी ‘’मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की, मी या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. या वसुंधरेला, या पर्यावरणाला माझ्या पासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम- सुफलाम करण्यासाठी कटीबद्ध राहीन व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला, या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि सुजलाम- सुफलाम करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करूया” अशी हरित शपथ सर्वांनी घेतली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि शिल्पा शशीधरण यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मानले. Post Views: 161