चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

पिंपरी, दि. २५ नोव्हेंबर २०२६ : चिखली घरकुल प्रकल्प परिसरात पावसाळ्यात पाणी साचून होणारे नुकसान टाळण्यासाठी नाला बांधणीचे काम आणि पर्यायी पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कामांना अधिक गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, शहरातील इतर भागांमध्ये पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झालेल्या ठिकाणीही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध नागरी समस्या, पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपआयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिताराम बहुरे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चिखली घरकुल परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास परिसरात पाणी साचून नागरिकांना आणि त्यांच्या मालमत्तेला नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील नाला बांधणीचे काम हाती घेण्याबरोबरच पाण्याचा पर्यायी निचरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच, शहरातील ज्या भागांमध्ये पावसामुळे पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवल्या होत्या, त्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. नियोजित कामे अधिक वेगाने पूर्ण करून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या टाळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
