अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
फुटपाथ अतिक्रमणमुक्त करून सलग पादचारी मार्गिका तयार करा; विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

पिंपरी, दि. २५ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि विविध नागरी समस्यांवर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात अतिक्रमणविषयक आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. अतिक्रमण कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित ठिकाणी आयुक्त स्वतः भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिताराम बहुरे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शहरातील अनधिकृत दुकाने आणि बांधकामे हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. पादचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता यावे, यासाठी फुटपाथची सलग जोडणी (फुटपाथ कनेक्टिव्हिटी) कायम ठेवावी. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून आवश्यकतेनुसार पाडकाम करावे, तसेच अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.
शहरात स्वच्छता आणि नागरी सुविधांवर भर
शहरातील सार्वजनिक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ परिसर दिसेल अशा पद्धतीने दृश्यमान स्वच्छता (व्हिजिबल क्लीनलिनेस) राखावी, असे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील गळतीच्या समस्या तातडीने दूर करून आवश्यक दुरुस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. बीआरटी मार्गालगतच्या महापालिकेच्या पार्किंग सुविधांचा योग्य वापर सुनिश्चित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करा
शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांवर केलेले अनधिकृत कल्व्हर्ट संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच हटवावेत. तसेच सोसायट्यांच्या माध्यमातून नाल्यांवर कल्व्हर्ट उभारण्यात आले असल्यास त्याची जबाबदारी संबंधित सोसायटीने घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाचे पाणी अडवले जाणार नाही किंवा त्याचा प्रवाह अन्यत्र वळवून नागरिकांच्या मालमत्तांना धोका निर्माण होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
आरएमसी प्लांटसाठी झोन आणि जागा निश्चित करण्याचे निर्देश
शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटच्या नियोजनाबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरात असलेल्या ६५ आर एम सी साइट्सनी निर्धारित नियम व निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या प्लांटसाठी स्वतंत्र झोन निश्चित करून त्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याबाबत नियोजन करावे. व्यावसायिक कारणांसाठी या प्लांटचा वापर करणाऱ्यांनी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
