*जनसंपर्क कार्यालयातील प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी हरपला*

पिंपरी चिंचवड प्रतीनीधी sakhinewslive.com महानगरपालिकेचे कर्मचारी संभाजी पवार यांनी महापालिका सेवेत दिलेले योगदान संस्मरणीय असून कामाच्या माध्यमातून सर्वांशी ऋणानुबंध निर्माण करण्याचा त्यांचा गुण हा प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखा असल्याचे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागातील कर्मचारी संभाजी शिवाजी पवार यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी कोरोना आजाराने निधन झाल्याने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या श्रध्दांजली कार्यक्रमावेळी महापौर ढोरे यांनी पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाच्या कर्मचा-यांसह इतर विभागातील कर्मचारी देखील उपस्थित होते.
संभाजी पवार यांच्या पश्चात त्यांचे वडील शिवाजी पवार, पत्नी सुनिता पवार, मुलगा पवनराज आणि ओंकार असा परिवार आहे. त्यांची दोनही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. सन १९९२ साली शिपाई पदावर महापालिका सेवेत रुजू झालेल्या संभाजी पवार यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी माहिती व जनसंपर्क विभाग, स्थानिक संस्था कर विभागात काम केले आहे. माहिती व जनसंपर्क विभागात काम करीत असताना विविध माध्यम प्रतिनिधींसमवेत त्यांनी उत्तम संवादाच्या माध्यमातून मैत्रीचे नाते निर्माण केले होते. अत्यंत साधे राहणीमान असणारा, कायम मदतीची भावना जोपासणारा सहकारी, अध्यात्मिक जीवनशैली अंगीकारणारा, प्रामाणिकपणे काम करणारा विश्वासू कर्मचारी अशी त्यांची ओळख होती. भोसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते महापालिका कार्यालयापर्यंत रोज सायकलने प्रवास करणा-यांपैकी ते एक होते. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना अन्न वाटपासाठी ओळखपत्र देणे, अत्यावश्यक प्रवासपास देणे, कोरोनासंबंधित कामकाजाची प्रसिध्दी करण्यासाठी पवार यांचा महत्वपुर्ण सहभाग होता.

पवार यांच्या निधनामुळे महापालिका कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून निकटचा सहकारी आपल्यातून निघून गेल्याची भावना यावेळी माहिती व जनसंपर्क विभागातील कर्मचा-यांनी व्यक्त केली.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी जोखीम पत्करुन अहोरात्र परिश्रम करीत आहेत. काही कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी देखील कोरोना बाधित झाले आहेत. तर काहींना आपला प्राण सुध्दा गमवावा लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणा-या प्रत्येकाने आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. कोरोना सदृश लक्षणे आढळताच नजीकच्या रुग्णालयात तात्काळ तपासणी करुन घ्यावी असे आवाहन यावेळी महापौर माई ढोरे यांनी केले.