आज शिक्षक दिन

Sakhi News Live:-

आज शिक्षक दिन! या निमित्ताने दरवर्षी शिक्षकांविषयी जसा आदर व्यक्त केला जातो, तशीच शिक्षकांच्या मूल्यमापनाची चर्चाही होत असते. आजूबाजूची परिस्थिती आणि सुविधांची उपलब्धता यात प्रचंड विविधता असलेल्या आपल्या शिक्षणक्षेत्रात जसे कठीण काळात नवे प्रयोग करणारे, दीपस्तंभासारखे शिक्षक आहेत, तसेच ‘जेवढय़ास तेवढे’ काम करण्याकडे कल असलेले शिक्षकही याच क्षेत्राचा भाग आहेत. मात्र नकारात्मकता काही काळ दूर ठेवून शिक्षकांपुढची आव्हाने समजून घेतली, तर त्यावर उपाय नक्की शोधता येतील. सध्याच्या अवघड ‘करोना’ काळात अधिकची तांत्रिक आव्हाने स्वीकारत वाटचाल करणाऱ्या शिक्षकांच्या विश्वाचे हे विविध पैलू.

शिक्षक दिनाला सगळ्यांनाच आम्हा शिक्षकांची विशेषत्वाने आठवण होते. पुरस्कार मिळतात, गौरव होतो. गुरुपौर्णिमेलाही विद्यार्थी प्रेमाने आणि आदराने भेटतात, भेटवस्तूही देतात. या निमित्ताने विचार करता येतो, की खरेच कसे आहोत आम्ही शिक्षक? ‘शाळा’ या शिक्षणाच्या औपचारिक व्यवस्थेचा गेल्या शतकामध्ये प्रसार होताना शिक्षक ‘असा असावा, तसा नसावा’ याविषयी मांडणी होत गेली..

महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज, ज्योतिबा फु ले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे अशा क्रांतिकारक आणि ताराबाई मोडक, लीलाताई पाटील, अप्पासाहेब पेंडसे, रमेश पानसे यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षकांसाठी अनेक तंत्र आणि मंत्र सुचवलेले आहेत. त्यांनी ते स्वत: अनुसरून सिद्ध केले आहेत. परंतु आम्ही ते पूर्णपणे जाणून घेतले आहेत का? त्यांचा वापर करण्याचा आम्ही किती प्रयत्न करतो? त्यामध्ये कोणकोणती आव्हाने आहेत? एकूणच आमचे मनोविश्व आणि शिक्षकीपण कसे आहे? असे किती तरी प्रश्न येऊन भिडतात.

या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी अभ्यास होत असतात. त्यात प्रामुख्याने शिक्षकांचे विषयज्ञान, अध्यापन पद्धती, दृष्टिकोन, अभिक्षमता (‘अ‍ॅप्टिटय़ूड’), समायोजन, याविषयी जाणून घेणे आणि त्याआधारे शिक्षकांच्या विविध गटांची तुलना करणे, असे स्वरूप असते. क्वचितप्रसंगी शिक्षकांना लाभलेल्या प्रशिक्षणाचा प्रभाव आजमावला जातो. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये सुमारे २०० शिक्षकांचे मानसशास्त्रीय साधनांद्वारे सर्वागीण मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता (कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, मूल्यमापन क्षमता), अध्यापनासंबंधित व्यक्तित्वगुण (आत्मविश्वास, नियोजन, उद्दिष्टाची जाण, भावनिक समतोल, चिकाटी आणि परस्परसंबंध), वर्गातील अध्यापन कौशल्ये (विद्यार्थ्यांमधील गुंतवणूक, अध्यापन तंत्रे, व्यवस्थापन, समाधान, दृष्टिकोन आणि शिक्षकी पेशाबद्दलचे मत), तसेच शिक्षक म्हणून व्यावसायिक विकास या चार आयामांचा समावेश होता. शिक्षकांच्या कामाच्या स्वरूपामध्ये विविधता होती. तरीही गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केल्यावर आढळले, की ते या सर्व आयामांबाबत मध्यम स्तरावर एकवटलेले होते. म्हणजे बहुतेकांना ५० टक्क्यांच्या आसपास गुण होते आणि परस्परभिन्नता कमी होती. विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे पोषक असे स्वत:चे वाचन, लेखन, संशोधन, असा व्यावसायिक विकास त्यांच्या बाबतीत आधीच्या वर्षभरामध्ये नगण्य होता. हा ढोबळ निष्कर्ष आम्हा शिक्षकांबाबतच्या अपेक्षा किती पूर्ण करतो? या अभ्यासातील मापनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तरी लक्षात येते, की देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी आमच्यामध्ये आवश्यक असलेले तळमळ, कार्यनिष्ठा, समर्पणभाव, अंत:प्रेरणा, व्यासंग हे ध्येयवादी गुण आम्ही अंगी बाणवले पाहिजेत. शिक्षक म्हणून मोठी झेप घ्यायला हवी!  अर्थात असे प्रत्यक्ष आणि अपेक्षित यांमधले महदंतर हे वैद्यकीय, वकिली, व्यापार आणि उद्योग अशा इतर क्षेत्रांमध्येही असणार. मात्र मनुष्य घडणीच्या दृष्टीने ते शिक्षणाबाबत कमी असावे, हे मान्य करावे लागते. तरीही घटकाभर हा अभ्यास बाजूलाच ठेवू या. निरीक्षण, चर्चा यांच्या आधारे सध्या आम्ही शिक्षक कसे आहोत, हे  पाहायला हवे.

यात महत्त्वाची अडचण अशी आहे की आमच्यामध्ये खूपच विविधता आहे. आमचे शिक्षण, वय, अनुभव, पद, विषय, आर्थिक आणि सामाजिक पाश्र्वभूमी यात तफावत आहे. याशिवाय शाळांचेही अनुदानित-खासगी, शहरी-निमशहरी-ग्रामीण, प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक, भाषेचे माध्यम, के वळ मुले-

के वळ मुली, की मुले-मुली एकत्र, असे अनेक प्रकार आहेत. त्यानुसार आमच्या भूमिका, आमच्यावरच्या जबाबदाऱ्या, आमच्याकडून असलेल्या अपेक्षा यांमध्ये भिन्नता आहे. शिक्षण संस्थांच्या वेगवेगळ्या ध्येयधोरणांनुसारही आमच्या कामांमध्ये फरक असतो. मग आम्हा शिक्षकांच्या मनोधारणेचा एकत्रित विचार करणे अवघडच, नाही का? तरी प्रयत्न करू या.

सुरुवातीलाच लक्षात येते, की सध्याच्या ‘करोना’ग्रस्त परिस्थितीमुळे ओढवलेल्या संचार बंधनांमध्ये आम्ही शिक्षक खरोखरच खूप धडपड करत आहोत. वातावरणामध्ये अनिश्चितता, धास्ती, चिंता दाटून आली आहे, विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ आहेत. अशा वेळी कधी कल्पनाही न  केलेले असे ‘आभासी अध्यापन’ करण्याचे आव्हान आम्ही नेटाने, यथाशक्ती पेलत आहोत. त्यासाठी तंत्रस्नेही झालो आहोत, विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रुटींवर नवनव्या कल्पना लढवून मात करत आहोत, विषय अध्यापनावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत, त्यासाठी व्यासंग वाढवत आहोत, एकमेकांकडूनही शिकत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत आणि हे सर्व स्वत:चे मन:स्वास्थ्य अबाधित राखून. सध्या विद्यार्थ्यांचा इतरांशी संपर्क खूप कमी झाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यासाठी आम्ही आणखी महत्त्वाचे बनलो आहोत. आम्ही शिक्षक या बहुतांशी स्त्रिया आहोत (शहरी खासगी शाळांमध्ये पुरुष शिक्षक अगदी कमी आहेत.). त्यामुळे स्त्रियांची नैसर्गिक स्वभाववैशिष्टय़े आमच्या शिक्षकी पेशामध्ये उतरतात. पालकत्वाच्या भूमिकेतून आम्ही विद्यार्थ्यांशी जवळीक साधत असतो. त्यांच्या घरची माहिती घेणे, सवड काढून गाणी, गोष्टी, गप्पा यांतून मूल्ये रुजवणे, आजूबाजूला आणि समाजात घडणाऱ्या गोष्टी- पाऊसपाणी, निवडणुका, अपघात, यशापयश यांची माहिती प्रसंगानुरूप देऊन त्यांना सामाजिक भान देणे, त्यांच्यातील विशेष गोष्टींचे कौतुक करून प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर त्रासदायक गोष्टींबाबत ताकीद देऊन त्या सुधारणे, हे करता करता त्यांच्या सुघडणीला आम्ही सतत मदत करत असतो. मतभेद, भांडणे, विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, लहानमोठय़ा चुका, यांबाबत मार्गदर्शन करून त्यांचे मन स्वस्थ ठेवणे, हा तर आमच्या रोजच्या कामाचा भागच असतो. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांची निगराणी होते. नाती सांभाळण्याच्या उपजत गुणामुळे आम्ही पालक, सहकारी, वरिष्ठ-कनिष्ठ यांच्याशी सुरळीत संबंध राखतो. एकूणच आमचे शाळेशी समायोजन (‘अ‍ॅडजस्टमेंट’) उत्तम असते. याच्या जोडीने कामाबाबत आस्था आणि टापटीप यांमुळे विद्यार्थी, शाळा हे प्रगतीपथावर राहातात, हे नक्की. आम्हा स्त्रियांना सांसारिक जबाबदारीमुळे शाळेचे काम झोकून देऊन करणे काहीवेळा अवघड होते, तरीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील पक्क्या पायाभरणीला मदत होते. याला अनुषंगून एक निरीक्षण नोंदवायला हवे, की सातवी-आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवताना प्रेम आणि धाक हे पुरेसे असते. त्यापुढच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या नव्याने फुटलेल्या (आणि उगारलेल्या!) ‘शिंगां’चा रोख सकारात्मक ठेवण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. त्याचप्रमाणे हातातल्या विषयावर मजबूत पकड हवी. त्यांचे ‘कल्याणमित्र’ (‘मेंटॉर’) होता आले तर त्यांच्या आयुष्यालाच वेगवान विधायक दिशा मिळते. आमच्यापैकी थोडय़ा जणांना हे जमते. बाकीचे निभावून नेतात!

आम्हा शिक्षकांच्या मनोधारणेत वयानुसार फरक पडतो. तरुण शिक्षणसेवक (विशेषत: ग्रामीण भागातले) नवे काही शिकण्यास राजी असलेले, उपक्रमशील, उत्साही आहेत. मुले आणि शाळाच नव्हे, तर आजूबाजूच्या समाजामध्येही आम्ही रमून जातो. आमचे राहाणे हे शाळेच्या आसपास असेल तर हे सहज घडते, कारण सर्वसाधारणपणे आमच्याविषयी आदर असतो. आम्ही त्यांचे आदर्श असतो. मात्र अलीकडे तालुक्याच्या गावी राहून गावातल्या शाळेत जाणे-येणे करण्याकडे आमचा कल वाढला आहे. मग वेळेच्या मर्यादा पडतात, जवळिकीमध्ये उणीव येते. मध्यम वयात शिक्षक म्हणून केवळ नोकरी करण्यापलीकडे काही करण्याची ऊर्मी असते. तशी सुरुवातही होते; पण पाठबळ कमी पडते, समविचारी अभावाने भेटतात. मग सातत्य राहात नाही. मरगळ येते, घुसमट होते. मुखवटे चढवून शिकवणे चालू राहाते. निवृत्ती जवळ आली, की गाठीशी भरपूर अनुभव जमतो. त्यामुळे शिकवणे आणि इतर जबाबदाऱ्या घेणे हे सहज जमते. मार्गदर्शन करण्याचे समाधान मिळते. निकड नसेल तर निवृत्तीनंतर शिकवण्याच्या वाटेपासून दूर राहाणे आम्ही पसंत करतो!

वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आम्ही अशी तुलना केली, तर आमच्यामध्ये अनेक जमेच्या बाजू आहेत हे निश्चित. आम्ही सर्व प्रशिक्षित तर आहोतच, पण पुष्कळजण द्विपदवीधर, अनेक विषयांमध्ये पदव्या घेतलेले, शालेय व्यवस्थापनासारख्या संबंधित विषयांचे अभ्यासक्रम केलेले असे उच्चशिक्षित आहोत. हे आमच्या व्यावसायिक विकासाला पोषक आहे. ‘गूगल’सारखे साधन सहज उपलब्ध असल्यामुळे आमचे विषयज्ञान उत्तम आहे. सध्या ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’, ‘व्हिडीओ’, ‘इंटरनेट लिंक्स’, ‘लर्निग अ‍ॅप्स’ वापरण्यासारखे तंत्रज्ञानातले गड कष्टपूर्वक सर करत आहोत. शिक्षेचा दरारा आणि भीतियुक्तआदर हे खूप मागे पडले आहे. विषयज्ञान, अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या वैकासिक टप्प्यांचे भान, यांमुळे आमचे शिकवणे सरस आहे. या उगवत्या सहस्रकातील व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे थोडेच आहे? आम्हालाही प्रचंड स्पर्धेला तोंड देऊन नोकरी टिकवायची आहे, पालकांच्या वाढत्या अपेक्षांना सामोरे जायचे आहे. एक वस्तुस्थिती आहे, की आमचे शिकवणे ‘परीक्षाकेंद्री’ झाले आहे. शालेय परीक्षेतील उत्तम गुण, उत्तम अभ्यासक्रमामध्ये प्रवेश, भरघोस पैसा देणारी प्रतिष्ठेची नोकरी, उच्च राहणीमान, या आताच्या उपभोगवादी साखळीमध्ये विद्यार्थी, पालक यांच्याबरोबरच आम्हीही जखडले गेलो आहोत. संगीत, कला, क्रीडा, समाजसेवा, या निखळ आनंददायी क्षेत्रांना वळसा घालून आम्ही शालेय माहिती ओतणारे बनलो आहोत. या धावपळीमध्ये विद्यार्थ्यांना ‘जगायचे का आणि कसे’ याचे भान देण्यामध्ये आम्ही उणे आहोत!

आमच्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि अर्ध-अनुदानित (इयत्तेच्या काही तुकडय़ा अनुदानित आणि काही विनाअनुदानित), या प्रकारच्या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या मनोधारणेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. अनुदानित शाळांमध्ये यथायोग्य वेतन आणि नोकरीची शाश्वती असल्यामुळे आम्ही समाधानी असतो, तन्मयतेने काम करतो. विनाअनुदानित शाळांमध्ये कधी अर्धवेळ नोकरी, बहुतेक वेळा चार अंकी वेतन, कायमस्वरूपी नोकरीचा अभाव, अपुऱ्या शिक्षक भरतीमुळे कामाचा भार जास्त, पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, अशा परिस्थितीमध्ये आम्ही तणावग्रस्त असतो. अशा परिस्थितीत शिकवण्याचा आनंद दूर राहातो, यात नवल ते काय? आमच्यातले काही जण संस्थेला देणगी देऊन नोकरी मिळवतात, हे काही गुपित नाही. ते जेवढय़ास तेवढे काम करून मोकळे होतात. शाळांची संख्या वाढत असल्यामुळे आपल्या शाळेकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी युक्त्या लढवाव्या लागतात, त्या वेगळ्याच. आमच्यातील मुख्याध्यापकपदावरील मंडळींना ‘मोठेपणा’मुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना हा एक वेगळाच विषय आहे!

आमच्याविषयी हा सगळा लेखाजोखा मांडतानाच नवे शैक्षणिक धोरण समोर उभे ठाकले आहे. त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आम्ही संकल्प करतो, की प्रकल्प पद्धत परिणामकारकरीत्या वापरू, विद्यार्थ्यांचे आपापसात आणि शिक्षकांचे एकमेकांना सहकार्य मिळवू, कल्पक उपक्रम राबवू. शिक्षण क्रांतीचे पाईक होऊ. प्रत्येक जिल्ह्य़ात शिक्षकी पेशाला समर्पित आणि आसपासच्या परिसराला चैतन्यदायी असे दीपस्तंभ आहेत. अशा  अनेक प्रेरणादायी शिक्षकांची नावे डोळ्यांसमोर आहेत. वाईचे नागेश मोने, साताऱ्याच्या ग्रामीण भागातील बालाजी जाधव, धुळ्याचे नंदकिशोर बागूल, वांद्रे येथील मिलिंद चिंदरकर, निगडीचे शिवराज पिंपुडे, आणि आणखी किती तरी! शाळेच्या अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये विषयाची अभिरुची रुजवण्यासाठी गडारोहण, वारसा सहली, गणितयज्ञ उपक्रम, कलादालन, मुलाखती, व्यक्तिरेखाटन, विज्ञान प्रदर्शने, वस्तुसंग्रहालय भेट, शेकडो विद्यार्थ्यांचे एकत्र गायन, असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले  जात आहेत. खरे तर यामुळे विषयाच्या पार पलीकडे जाऊन वर म्हटल्याप्रमाणे ‘जगायचे का आणि कसे’ हे उमगून विद्यार्थीघडण होते.

‘ज्ञानप्रबोधिनी ’अनेक वर्षे ‘रूप पालटू शिक्षणाचे’ या नावाने ‘बी.एड.’ (बॅचलर ऑफ एज्युके शन) झालेल्यांसाठी, आणि चिपळूण येथे २२ शाळांमधील शिक्षकांसाठी ‘शिक्षण प्रेरणा जागृती’ वर्ग घेते. त्या निमित्ताने आम्ही शेकडो समविचारी व्यक्ती एकत्र येतो, नवनवी तंत्रे आत्मसात करतो आणि नंतर सातत्याने, एकमेकांच्या सहकार्याने आपापल्या शाळांमध्ये काम करतो. विशेष म्हणजे इतर शिक्षकही आमच्यात सहभागी होतात. एकमेकांच्या शाळांमध्ये जाऊन शिकवण्यापर्यंत आम्ही मजल मारली आहे. आमच्यातील प्रयोगशील दीपस्तंभांच्या चळवळीमुळे सध्याच्या संचार बंधनातील आणि भविष्यातील नव्या शैक्षणिक धोरणानुसारच्या शिक्षणातील आमचा वाटा आम्ही समर्थपणे पेलू, हे नि:संशय!