खते आणि रोपांची काळजी

SAKHI NEWS LIVE:-

मागील लेखात आपण कंपोस्ट तयार करण्याची माहिती घेतली. त्याप्रमाणे काही जणांनी कृती सुरूही केली असेल. पण तरीही मनात अनेक प्रश्न असतील. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, घरात दुर्गंधी तर पसरणार नाही ना? अळ्या, किडे, डास, झुरळं तर होणार नाहीत ना?

याचं एकच आणि सोपं उत्तर म्हणजे कचरा जमा केलेला ड्रम किंवा बास्केट जर पुरेशी हवेशीर असेल तर वरील कुठलाही त्रास होणार नाही. मुळात हवा खेळती राहिली आणि सूक्ष्म जीवांची क्रिया चांगली चालू राहिली की विघटनाची क्रिया पूर्ण होऊन उत्तम खत तयार होतं.

याबाबतीत माझा अनुभव सांगते. बास्केटमध्ये कम्पोस्ट करण्याची प्रक्रिया मला त्या मानाने सोपी वाटली. याचं कारण म्हणजे, एक तर बास्केटला फार जागा लागत नाही. ती सहज हलवता येते. शिवाय आपण कचरा बारीक करून त्यात टाकत असल्यामुळे आणि कोकोपीट वापरत असल्यामुळे त्यातील

ओलावा शोषला जाऊन, काहीसं कोरडं आणि सहजी वापरता येईल असं खत सतत तयार होतं राहतं.

ड्रमच्या पद्धतीने खत तयार करताना मात्र थोडी अधिक काळजी घ्यावी लागली. ड्रममध्ये घरातला सगळा ओला कचरा अगदी ओले अन्नपदार्थ, खराब झालेली पिठं असं सगळं टाकू शकतो. थोडक्यात, सगळ्या प्रकारचा ओला कचरा रिचवता येतो. परंतु असं करताना पुरेसा पालापाचोळा, लाकडाचा भुसा किंवा नारळाच्या शेंडय़ा, सुकं गवत यातील एखादी तरी गोष्ट हाताशी असावी याची काळजी घ्यावी लागते. कारण कचऱ्यातील ओलावा शोषणं गरजेच असतं, अन्यथा त्याला दुर्गंधी येते. या ड्रमला एखाद्या तिवईवर किंवा स्टॅन्डवर ठेवावे. कारण यातून द्रव बाहेर येतो.  तो द्रव गोळा करून त्यात पुरेसे पाणी मिसळून त्याचा आपण द्रवयुक्त खत म्हणून वापर करू शकतो.

या वर्षी खूप पाऊस झाला. माझ्या डेकवर ठेवलेला ड्रम सतत ओला होत होता. त्यामुळे मला वाटलं की, खत चांगलं तयार होणार नाही. सततच्या ओलाव्याने अळ्या होतील, पण असं काहीही घडलं नाही. सुका पाला पावसाळ्यात मिळाला नाही त्या वेळी आंब्याच्या पेटय़ांमधील गवताचा वापर केला आणि तीन महिन्यांनी उत्तम खत मिळालं.

मागील दीड वर्षांपासून आमच्या घरातून ओला कचरा बाहेर जात नाही. फक्त सुका कचरा, तोही दोन दिवसांनी दिला जातो. आपण जर डोळसपणे आणि नीट समजून घेऊन कम्पोस्ट केलं तर कुठल्याही खर्चीक साधनांचा वापर न करता घरच्या घरी कंपोस्ट करता येतं. यातून खत तर मिळतंच, पण व्यवस्थेवरचा ताणही कमी होतो. आणि एक स्वानुभव म्हणून सांगते, ओला कचरा ही कटकट न वाटता त्याच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते. खरं तर प्लास्टिकच्या पिशवीत ओला कचरा जमवणं हेच कष्टाचं काम आहे.

शहरी लोकांनी आपापल्या घरातील ओल्या कचऱ्याचं विघटन करणं ही आता गरज बनली आहे. डम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर होणारे परिणाम जर समजून घेतले तर कोणीही संवेदनशील सुज्ञ व्यक्ती कंपोस्ट करण्याचाच निर्णय घेईल.

शेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर कम्पोस्ट करणं हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर पुढे चर्चा करूच.

झाडांना कंपोस्ट खताबरोबरच, गांडूळ खत शेणखत द्यायला हवं. लेंडी खताचाही उपयोग करता येईल, फक्त लेंडी खत वापरताना थोडी काळजी घ्यायला हवी. प्रथम हे खत अगदी थोडय़ा प्रमाणात देऊन रोपांना कितपत मानवेल याचा अंदाज घ्यायला हवा. लेंडी खत हे उष्ण असतं. त्यामुळे प्रयोग करून त्याचं प्रमाण ठरवावं. वरील खतं वापरली तरी वनस्पतींची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज शिल्लक राहतेच. त्यासंबंधीचे मी केलेले प्रयोग आणि निरीक्षणं याविषयी पुढील लेखात लिहीन. तोवर ‘माणूस आणि झाड’ हे नीळू दामले यांचं माहितीपूर्ण पुस्तक मिळवून अवश्य वाचा.