गुंतवणुकीचा फेरविचार करताना..

SAKHI NEWS LIVE:-

आयुष्यभर आपल्या इच्छा बाजूला ठेवत, पै-पै साठवत, बचत ते गुंतवणुकीचा प्रवास केलेल्या गुंतवणूकदाराचं मन आज साशंक झालं आहे. याचं एक कारण म्हणजे, अनेक वेळा गुंतवणुकीच्या सुरुवातीला असणारी आयुष्याची परिस्थिती स्थित्यंतरांनुसार बदललेली असते. आज नेमकं तेच घडलं आहे. सध्याच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत केवळ हाती पैसा कसा राहील, या एकाच विचारानं भांबावून गेलेल्या गुंतवणूकदारांना आपण यापूर्वी निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल फेरविचार करावासा वाटणं साहजिक आहे. अशा वेळी त्यांनी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, याचे पर्याय मांडणारा लेख..

आर्थिक साक्षरतेविषयीचे विविध उपक्रम सध्याच्या टाळेबंदीच्या काळातही सुरू आहेत. बदललं आहे ते केवळ त्यांचं माध्यम. नेहमी बचत आणि गुंतवणूक यावर बोलता बोलता, या प्रतिकूल दिवसांनी विचार करण्यास भाग पाडलं, की आनंदी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी  पैशांची गुंतवणूक जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची गुंतवणूक ठरते ती वेळेची, निरोगी आरोग्याची, योग्य विचारांची आणि उत्तम कौशल्यांची!  या आव्हानात्मक दिवसांमध्ये ‘करोना’मुळे प्रत्येकाला विविध घटकांचा विचार करण्याची संधी मिळाली, नव्यानं शिकण्याची गरज भासली, आणि आत्मपरीक्षणाची निकड जाणवली.

आर्थिक साक्षरतेच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच गुंतवणूकदारांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या मनातल्या शंका मोठय़ा प्रमाणावर समोर आल्या. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहे, असं जाणवलं.  सुखवस्तू कुटुंबांकडूनही अनेकदा  विविध प्रश्न समोर येत असतात. उदा. समीर आणि सरोज- वय वर्षं ४० ते ४५ च्या मध्ये.  दोघांचा हा कमावता आणि जबाबदारीनं भरलेला असा आयुष्याचा टप्पा. १४ आणि १६ वर्षांंची दोन अपत्यं, सेवानिवृत्त आणि समाधानी वडील, असं हे खरंतर आनंदी कुटुंब. उत्पन्नातून बचत करणारं, त्या बचतीतून गुंतवणुकीचे विविध पर्याय निवडणारं, भविष्याकडे सकारात्मकतेनं बघणारं. संसाराची जबाबदारी पेलताना वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी बँकेच्या मदतीनं घर घेतलं. दोघांचाही जीवन विमा आहे. काही प्रमाणात गुंतवणूक म्हणून घेतलेले उत्तम कंपन्यांचे  समभाग (‘शेअर्स), तसंच ‘मुच्युअल फंडा’तली नियमित गुंतवणूकसुद्धा आहे. सेवानिवृत्तीनंतर आलेले वडिलांचे पैसे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले होते. त्यातून प्रतिमहिना येणारं व्याज वडिलांना स्वत:च्या खर्चासाठी पुरेसं ठरत होतं, शिवाय त्यांना समाधान होतं ते मुद्दल अडीअडचणीसाठी जोखीमरहित असल्याचं.

परंतु आजच्या मंदी सदृश्य वातावरणामुळे आलेल्या आर्थिक आव्हानांमध्ये आता भर पडली ती ‘करोना’मुळे तयार झालेल्या प्रतिकूल परिस्थितीची. त्यात हाती येणारा कमी पगार आणि नोकरीची डगमगणारी अवस्था या कुटुंबाच्या काळजीचं कारण ठरत आहे. उत्पन्नाची आणि खर्चाची जुळवाजुळव करणं कठीण होत आहे, कारण रोजचे खर्च, व्याजाचे हप्ते, केलेल्या गुंतवणुकीचे हप्ते, यांचं नियोजन जरा अवघड जात आहे. त्यात दिवसेंदिवस कमी होणारे व्याजदर, सातत्यानं बदलणारा शेअर बाजार या गोष्टी गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करतात, की कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक पुढे नेणं योग्य, की थांबणं योग्य? आपण विविध गुंतवणुकीचे पर्याय निवडलेले असतानासुद्धा असं का होतं, या विचारानं समीर आणि सरोज सध्या गोंधळून गेले आहेत. हीच परिस्थिती थोडय़ा फार प्रमाणात प्रत्येक गुंतवणूकदाराची झाली आहे.

त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केल्यावर काय दिसतं हे पाहायला हवं.

समीर आणि सरोज दोघांचंही उत्पन्न पूरक होतं म्हणून त्यांनी कर्ज घेऊन घर घेतलं. पण सध्याच्या परिस्थितीत हाती पगार कमी येतो आणि त्यात नोकरीची शाश्वतीही कमी दिसते. पुढील कर्ज फेडताना अडचणी येतील असं जाणवतं आहे. कर्ज घेतलं म्हणून त्यास पूरक म्युच्युअल फंडाची नियमित गुंतवणूक सुरू केली. तो निर्णय योग्य. मग त्यांची शंका अशी, की काय चुकलं नेमकं? आम्ही तर सगळं नीट विचार करून केलं होतं.

नक्कीच विचारपूर्वक केलं होतं, पण फक्त त्या वेळेचा विचार केलेला होता. आर्थिक नियोजन करताना भविष्यातल्या अडचणींचा, गरजांचा  विचार करायचा राहून गेला.

– घर घेताना नियम म्हणून जीवन विमा घेतला, पण कर्जाच्या रकमेच्या दुपटीइतका विमा योग्य आणि आवश्यक असतो.  म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक तर केली, परंतु त्या प्रकारातून मिळणारा परतावा दर या कर्जाच्या दरापेक्षा कमी होता.

– तसंच उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा जीवन विम्याचा हप्ता भरण्यातच जातो आहे, पण जर जीवन विम्याच्या ऐवजी आपण मुदत विमा (‘टर्म इन्श्युरन्स’) घेतला असता तर हप्ता कमी बसला असता, आणि त्यातून बचत होऊन आपण आणखी महत्त्वाचे, अधिक परतावा देणारे गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकलो असतो- जसं की ‘एज्युकेशनल प्लॅन’मधील गुंतवणूक. कारण आपल्या अपत्यांच्या शिक्षणाचा खर्च १५ वर्षांंनी समोर येणार होता, आणि त्यासाठी हळूहळू नियमित गुंतवणूक झाली असती तर आता ही काळजी भेडसावली नसती.

– अपत्यांच्या शिक्षणासाठी तरतूद म्हणून उत्तम समभाग त्यांनी घेतले. पण आज बाजार सतत अस्थिर असताना त्यातून गुंतवणूक परत काढणं आणि शिक्षणाची गरज पुरवणं कठीण. आर्थिक क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचा सल्ला आता थांबण्याचा, या गुंतवणुकीतून बाहेर न पडण्याचा आहे. या गुंतवणुकीतून पुढे योग्य आणि चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आज नुकसान न केलेलं योग्य.

– समीर-सरोज परिवारानं आपल्या आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. घरापेक्षाही जास्त प्राथमिकता दर्शवणारी आरोग्य विम्याची गरज होती, आणि त्याकडेच दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसतं. आता जर एखादा मोठा आजार समोर येऊन ठेपला, तर आपण आतापर्यंत गोळा केलेली गुंतवणूक त्यासाठी खर्ची पडेल, आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेलं आर्थिक नियोजन साध्य होणं कठीण होईल.

– वडिलांच्या सेवानिवृत्तीतून आलेली रक्कम जोखीमरहित पर्याय म्हणून बँकेत तर ठेवली, पण दिवसेंदिवस कमी होणारे व्याजदर आता        त्यांच्यासाठी काळजीचं कारण बनत आहे. स्वत:चे खर्च पूर्ण करणं काहीसं अवघड जात आहे. ही रक्कम नवीन कोणत्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणं योग्य आहे, हे ठरवणं अवघड ठरत आहे.

– नोकरी हा आपला एकमेव उत्पन्नस्रोत असताना, त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असताना, आपण नोकरीचा विमा घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. जर आपण तो पर्याय निवडला, तर नोकरी गेल्यास किमान ३ महिने तरी आपणास उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधण्यास कालावधी मिळतो, आणि या कालावधीतली काळजी कमी करता येते.

– सरोजला सोन्याच्या दागिन्यांची आवड आहे. पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी हा एक आवश्यक घटक. पण सोनं गुंतवणूक म्हणून घेत असाल तर दागिने न घेता इतर सोन्याच्या गुंतवणुकीचे पर्याय विचारात घेणं आवश्यक होतं. जसं ‘गोल्ड बॉण्डस्’, ‘गोल्ड ईटीएफ’ (‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडस्’) इत्यादी. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत सोन्याचे भाव वाढले आहेत ही बातमी आनंदाची आहे. कारण जर आपणास  आवश्यकता असेल, तर गुंतवणूक (?) म्हणून घेतलेलं सोनं विकून आपण गरज पूर्ण करू शकतो. पण सरोजनं सोन्यात गुंतवणूक केलेली नसून सोन्याची खरेदी केली होती. तसंच त्यात भावनिक गुंतवणूक होती. म्हणून आज ते विकताना मानसिकता साथ देत नाही.

खरं तर आयुष्यभर आपल्या इच्छांना बाजूला ठेवत, पै-पै गोळा करत, बचत ते गुंतवणुकीचा प्रवास केलेला असूनही गुंतवणूकदाराचं मन आज साशंक का आहे याचं कारण अभ्यासलं तर मला वाटतं, की आपण नेहमी सकारात्मक विचार करतो (आणि तसाच करायला हवा. अजूनही वेळ गेली नाही) पण अनेक वेळा सुरुवातीला पैसे भरताना असणारी आयुष्याची परिस्थिती स्थित्यंतरांनुसार बदललेली असते. वाढती महागाई, वाढलेले खर्च, यांमुळे आपण आधी सुरू केलेले जीवन विम्याचे हप्ते, कर्जाचे हप्ते, म्युच्युअल फंडाचे पर्याय, पुढील लांब पल्ल्यांची प्रीमिअमची बांधिलकी, इत्यादी फेडणं जड जातं. मिळणारा परतावा, नवनवीन व अधिक फायद्याच्या इतर गुंतवणुकीच्या निवडलेल्या योजना, यांचा एकत्रित विचार केल्यास आपण फेरविचार करावा असं आढळून येतं. परंतु पुन्हा नव्यानं सुरुवात करताना नेहमी आपली जीवनशैली आणि आपल्या गरजा ओळखून जर पर्याय निवडले, भविष्यातल्या खर्चाची तरतूद केली, तर अडचणी आल्या तरी त्यावर मात करणारा दुसरा पर्याय आपण नक्कीच निवडलेला असेल.

‘करोना’ च्या या दिवसांनी आपल्यासमोर परत एकदा आरोग्य विम्याची गरज अधोरेखित केली आहे. आज जर शक्य असेल तर, प्रामुख्यानं आरोग्य विमा नसेल तर तो घेताना आणि असेल तर नमूद घटकांचा अभ्यास करत आरोग्य विमा विचारात घ्यायला हवा. विचारपूर्वक निवडलेली विमा पॉलिसी आपल्याला आजाराच्या क्षणी आव्हानात्मक आर्थिक प्रसंगांपासून वाचवण्यास मदतीची ठरते, कारण अडचणींचा सामना प्रत्येक वेळी करावा लागणार असतो, फक्त येणारी अडचण नवी असेल.

आता नव्यानं म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडताना गुंतवणुकीची उद्दिष्टं व जोखीम यांचा ताळमेळ बसवावा लागेल. एखादं विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ची योग्य योजना निवडणं आवश्यक आहे, कारण एखादं वित्तीय उद्दिष्ट जितकं दूरचं तितकं ते पूर्ण करण्यास आवश्यक असते ती जास्त जोखीम स्वीकारण्याची ताकद.  गुंतवणूकदार विमा वगळता अन्य सर्व पर्यायांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवून असतो. परंतु एकदा का जीवन विम्यात गुंतवणूक केली, की त्याचे प्रीमिअम भरण्याखेरीज कधीही त्या पर्यायाचा फेरविचार मनात आणत नाही. कारण आपण दीर्घ मुदतीची बांधिलकी मानसिकरीत्या मान्य केलेली असते. परंतु इतर गुंतवणुकीच्या पर्यायांना लागू होणारे गुंतवणुकीचे सर्व नियम विमा गुंतवणुकीलाही लागू व्हायला हवेत, किंवा गुंतवणूकदारानं ते विचारात घ्यायला हवेत. म्हणून नवनवीन येणाऱ्या योजनांचा वा पर्यायांचा सातत्यानं विचार करत गेलं पाहिजे. उपलब्ध पर्यायानुसार पुनर्आखणी करणं गरजेचं आहे. आधी केलेल्या गुंतवणुकींचा आढावा घेऊन सुधारित उपाययोजनेनुसार नवीन पर्यायी योजना अमलात आणता येते.

खरं तर जीवन विमा हा व्यक्तीच्या मृत्यूमुळे अटळ असणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या भरपाईसाठी अत्यंत आवश्यक असा अर्थविचार आहे. परंतु गुंतवणूक आणि जीवन विमा असा एकत्र विचार करून अनेक गुंतवणूकदार विमा पॉलिसीत मालमत्ता अडकवून ठेवतात. त्यासाठीच पारंपरिक विमा पॉलिसीतून बाहेर पडण्यासाठी ‘रिडय़ूस्ड पेड-अप’ पर्याय आणि ‘सरेंडर’ पर्याय उपलब्ध आहेत. यांच्या मदतीनं ‘विमा पोर्टफमेलिओ’ची पुनर्बांधणी करावी. मुदतीच्या विमा पॉलिसीचा पर्याय नक्कीच विचारात घ्यावा आणि आर्थिक अपव्यय टाळावा.

गुंतवणुकीची सुरुवात करणं सोपं असतं, परंतु बाजाराच्या चढ-उतारानुसार कमीअधिक होणाऱ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवणं अवघड आहे. अर्थात अभ्यासपूर्ण प्रयत्नांतून तेही शक्य होईल. आता पुन्हा योग्य योजना निवडण्यासाठी अधिक परताव्याचा तात्कालिक मोह आणि बाजाराच्या होणाऱ्या चढउताराची भीती टाळणं आवश्यक आहे. म्हणतात ना, की माणूस पाण्यात पडून बुडत नाही. बुडतो, तो तिथेच, तसाच पडून राहिला तर, हात-पाय न मारल्यामुळे.

‘करोना’च्या या आव्हानात्मक दिवसांनी प्रत्येकाची गती कमी केली, आणि विचार करण्यास भाग पाडलं, की या जीवनात सुखी, समाधानी, आर्थिक स्वातंत्र्य असलेली जीवनशैली साध्य करणं महत्त्वाचं आहे.