मास्क न घातलेल्या पुणेकरांकडून तब्बल एक कोटींचा दंड वसूल, पोलिसांची कारवाई

Sakhi News Live:-

पुणे शहरात करोना विषाणूं या आजाराने थैमान घातले असून एक लाखाचा नकोसा आकडा शहराने पार केला आहे. या दरम्यान असंख्य नागरिकांचा बळी गेला आहे. हा आजार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून अनेक उपाय योजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क न घालणार्‍या व्यक्तींविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पुणे पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणेकर नागरिकांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली.

पुण्यातील टीव्ही 9 वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे करोनामुळे बुधवारी पहाटेच्या सुमारास शिवाजीनगर येथील जम्बो रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. पांडुरंग रायकर यांना वेळीच कार्डियाक रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या देखील मृत्यू झाला. या दोन्ही घटनांवरून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुणे शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत करोना बाबतची सद्य स्थिती जाणून घेतली.

बैठकीमधील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराची लोकसंख्या ४० लाखांहून अधिक असताना शहरात कार्डियाक रुग्णवाहिका केवळ तीन आहे. त्यातील एका रुग्णवाहिकेचा तांत्रिक बिघाड झाल्याने ती पोहोचू शकली नाही. तर दुसरी पोहोचण्यापूर्वी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णांसाठी सहा कार्डियाक रुग्णवाहिका पुढील चार दिवसांत दाखल होतील. तसेच रेमडीसिवीरची १५० इंजेक्शन रूग्णांच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. तसेच पांडुरंग रायकर आणि दत्ता एकबोटे यांच्या निधनाचे शरद पवार यांनी दुःख व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यापुढे शहरातील प्रत्येक रुग्णाला चांगली सुविधा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सेवेसाठी तत्पर रहा. तसेच एखाद्याचा घरात रुग्ण आढळल्यावर घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये भीती निर्माण झालेली असते. अशा कुटुंबियांना धीर देण्याचे काम करा आणि लवकरात लवकर हेल्पलाईन सुरू करावी. जेणेकरून प्रत्येकाला चांगले उपचार मिळतील अशा सूचना बैठकीत शरद पवार यांनी केल्या आहेत.

करोना आजारापासून दूर राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मास्क लावले पाहिजे. अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या. मात्र अनेकवेळा नागरिक मास्क न घालता फिरताना पाहण्यास मिळाले. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्या कारवाईमधून तब्बल एक कोटीचा दंड वसुल केल्याने, शरद पवार यांनी पुणेकर नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी जाताना मास्क घालून बाहेर जावे. तसेच अनावश्यक बाहेर फिरू नये, असे आवाहन केले. तसेच, अशा प्रकारे नागरिकांमध्ये आणखी प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना  केल्या.