महाराष्ट्रातील कबड्डीला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेण्यासाठी महेशदादा सारख्या नेतृत्वाची गरज : अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव
धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीगच्या निवड चाचणीत जाधव यांचे प्रतिपादन
– राज्यातील सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंना संधी देण्याची व्यक्त केली अपेक्षा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कबड्डीचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी आमदार महेश दादा लांडगे यांच्यासारख्या नेतृत्वाचे भक्कम पाठबळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी केले. भोसरीत आयोजित ‘धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीग’च्या निवड चाचणीप्रसंगी ते बोलत होते.
मातीच्या मैदानापासून मॅटपर्यंतचा कबड्डीचा प्रवास अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संघटकांच्या मेहनतीतून घडला. महाराष्ट्राला कबड्डीची समृद्ध परंपरा लाभली आहे. या लीगमधून नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. त्यांच्यातील गुणवंत खेळाडू भविष्यात प्रो-कबड्डी लीगमध्येही स्थान मिळवू शकतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित ‘धर्मवीर कबड्डी प्रीमियर लीग’च्या निवड चाचणीचा भोसरीत शुभारंभ झाला.यावेळी ते बोलत होते.
सध्या जिल्हास्तरावर सुरू असलेल्या या लीगचा राज्यभर विस्तार व्हावा. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंना सहभागी करून घेतल्यास देशातील एक आदर्श कबड्डी लीग उभी राहू शकते. प्रत्येक संघात इतर जिल्ह्यांतील गुणवंत खेळाडूंना संधी दिल्यास त्यांना स्पर्धात्मक अनुभव मिळेल. दर्जेदार स्पर्धा, पारदर्शक कारभार आणि समान संधी यांमुळे राज्यातील कबड्डीचा पाया अधिक मजबूत होईल, असे जाधव यांनी सांगितले.
*****
राष्ट्रीय स्पर्धांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराची मागणी
हरियाणा, पंजाब आणि दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्र काही बाबतींत मागे असला, तरी योग्य नियोजनातून राज्य पुन्हा कबड्डीत आघाडी घेऊ शकते, असे मत जाधव यांनी मांडले. राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघाचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. कबड्डीच्या विकासासाठी संघटनात्मक पुढाकार आणि आर्थिक पाठबळ आवश्यक असल्याचे सांगत जाधव यांनी आमदार महेश दादा लांडगे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. लीगच्या आयोजनात कार्तिक लांडगे यांनीही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली असून, खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
