पिंपरी चिंचवडबातम्या

नाटक हा समाजजीवनाचा आरसा! – सतीश आळेकर

‘रंगानुभूति : पूर्वरंग ते उत्तररंग’ नाट्य प्रयोगकला महोत्सवात मार्गदर्शन

पिंपरी (दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६) ‘नाटक हा समाजजीवनाचा आरसा असतो!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक पद्मश्री प्रा. सतीश आळेकर यांनी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी केले. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति : पूर्वरंग ते उत्तररंग’ – नाट्य प्रयोगकला महोत्सवात ‘संहिता ते मंच’ या अभ्यासवर्गात मार्गदर्शन करताना प्रा. सतीश आळेकर बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, उपायुक्त पंकज पाटील, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंचाचे संचालक प्रभाकर पवार तसेच अमृता ओंबळे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. 

अण्णा बोदडे यांनी प्रास्ताविकातून, ‘तरुण पिढीला संस्कृती अन् कलेचा वारसा जोपासण्यासाठी दिग्गजांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल!’ असा विश्वास व्यक्त केला. प्रा. सतीश आळेकर पुढे म्हणाले की, ‘कोणत्याही नाट्यकृतीला शिस्तबद्धता प्राप्त होण्यासाठी संहितेची गरज भासते. नाटक ही समूहाने सादर करण्याची कला असून तिला आर्थिक पाठबळ,  अर्थगर्भ संहिता, दिग्दर्शन, रंगमंच, नेपथ्य, कलाकार आणि उत्कृष्ट निर्मितिमूल्ये अशा बाबींची जोड आवश्यक असते. जागतिकीकरणानंतर पारंपरिक ललितकला आणि करमणुकीची माध्यमं यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. विनोदाचा विचार करता लाॅरेल – हार्डी आणि चार्ली चॅप्लिन असे दोन मुख्य प्रवाह आढळून येतात. त्यापैकी हसताहसता अंतर्मुख करणारा चॅप्लिनचा विनोद जास्त भावतो. मराठी रंगभूमीवर चिं. वि. जोशी, बाळकराम, दिवाकर, पुलं आणि तमाशातील सोंगाड्या हे विनोदाचे बिनीचे शिलेदार मानले जातात. नाटक करणे ही आपली अपरिहार्य गरज आहे का, हा प्रश्न अंतर्मुख होऊन प्रत्येक रंगकर्मीने स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येक नाटकात अप्रत्यक्षरीत्या राजकीय विचार मांडलेला असतो; आणि अर्थातच त्याला दोन बाजू असतात. नाट्यसाधना करीत असताना एखादा साक्षात्काराचा क्षण येतो अन् साधकाला त्याचा सूर गवसतो. त्यामुळे प्रत्येक रंगकर्मीने संहितेशी समरस झाले पाहिजे. कलाकार आणि प्रेक्षक यामध्ये एक धूसर सीमारेषा असते. जिवंत नट अन् जिवंत प्रेक्षक यांना एआय हे तंत्रज्ञान कधीही पर्याय होऊ शकत नाही!’ मार्मिक उदाहरणे आणि संदर्भ उद्धृत करीत आळेकर यांनी विषयाची मांडणी केल्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.   

त्यानंतर महोत्सवात आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, प्रा. प्रवीण भोळे, डाॅ. आरती सूर्यवंशी, रूपाली भोळे, प्रभाकर पवार आणि अमृता ओंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ललित कला केंद्र – गुरुकुल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रस्तुत ‘संगीत बोंबाबोंब’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रयोगापूर्वी डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी, ‘रंगानुभूति हा नाट्यमहोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत!’ अशी ग्वाही दिली; प्रयोगानंतर प्रा. प्रवीण भोळे यांनी, ‘माल्थस या अर्थशास्त्रज्ञाने जगात नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित असून माणसाची हाव अमर्यादित आहे, असा सिद्धान्त मांडला होता. त्यावर दक्षिण अमेरिकेतल्या उरुग्वे देशातील मुरगा या राजकीय उपहासात्मक संगीतमय नाट्यशैलीतील नाटकाच्या ‘संगीत बोंबाबोंब’ या नावाने मराठी रंगावृत्तीचे मी लेखन केले असून  ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी त्याचे अप्रतिम सादरीकरण केले!’ अशी माहिती दिली. थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंचाच्या विद्यार्थ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. तेजस्विनी गांधी – कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.