शानदार दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

पिंपरी-चिंचवड : शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शानदार दिवाळी अंक २०२६’ चा प्रकाशन सोहळा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, लेखकांचा गौरव आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यामुळे हा प्रकाशन सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.
यंदाच्या ‘शानदार दिवाळी अंक २०२६’ चे वैशिष्ट्य म्हणजे हा अंक नारीशक्ती आणि मायेच्या ममतेचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक हिरकणीला समर्पित करण्यात आला आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर हिरकणीचे चित्र साकारून तिच्या धाडसाचा, साहसाचा आणि मातृत्वाच्या अतुलनीय सामर्थ्याचा गौरव करण्यात आला आहे.

शानदार दिवाळी अंक हिरकणीला समर्पित
रायगड किल्ल्यावर आपल्या लहान बाळाला सोडून आलेल्या हिरकणीने बाळाच्या ओढीने अंधाऱ्या रात्री जीवाची पर्वा न करता किल्ल्याचा अवघड कडा उतरून जाण्याचे अतुलनीय धाडस दाखविले होते. मातृत्वाची ओढ, संकटांवर मात करण्याची जिद्द आणि अशक्य वाटणारे आव्हान स्वीकारण्याची ताकद यांचे हिरकणी हे प्रेरणादायी प्रतीक आहे. तिच्या या शौर्यगाथेतून आजच्या महिलांनाही धैर्य, आत्मविश्वास आणि संघर्षाची प्रेरणा मिळते.
याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून शबनम न्यूज मीडिया ग्रुपने यंदाचा दिवाळी अंक हिरकणीला समर्पित केला आहे. केवळ मुखपृष्ठापुरता मर्यादित न राहता महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या प्रकाशन सोहळ्याला नगरसेविका तथा ‘ग’ प्रभाग अध्यक्षा मनीषा ताई प्रमोद पवार, नगरसेविका शालिनीताई गुजर, नगरसेविका योगिताताई बारणे, नगरसेवक तुषार सहाणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य संभाजी बाळासाहेब बारणे, सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या अमित बाबर, पीके इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथ काटे, माजी नगरसेवक कैलास बाबा बारणे, नगरसेवक तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश तरस, सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या या साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लेखकांच्या साहित्यिक योगदानाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
‘शानदार दिवाळी अंक २०२६’ हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून साहित्य, विचार, सामाजिक प्रश्न आणि समाजातील विविध घडामोडींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. विविध विषयांवरील लेख, विचारप्रवर्तक लिखाण आणि सामाजिक आशयाच्या माध्यमातून वाचकांना समृद्ध साहित्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.
या अंकासाठी आपले लेखन योगदान देणाऱ्या लेखकांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. नवोदित आणि अनुभवी लेखकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या लेखणीला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजातील महत्त्वपूर्ण विषयांना शब्दरूप देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
लेखकांच्या सन्मानामुळे साहित्य क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन मिळाले असून, अशा उपक्रमांमुळे वाचनसंस्कृती आणि लेखनाची आवड वृद्धिंगत होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू वैष्णवी सायकरचा विशेष सन्मान!
या सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू वैष्णवी सायकर हिचा करण्यात आलेला विशेष गौरव!
तैवान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत वैष्णवी सायकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या या खेळाडूच्या कर्तृत्वाची दखल घेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा सन्मान केल्यामुळे नव्या पिढीला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असा सकारात्मक संदेश या सन्मानातून देण्यात आला.
ऐश्वर्या अमित बाबर यांना ‘शानदार सशक्त नारी पुरस्कार’ प्रदान!
सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या ऐश्वर्या अमित बाबर यांना यंदाच्या प्रकाशन सोहळ्यात ‘शानदार सशक्त नारी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
महिला, मुली आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच समाजातील विविध मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, नेत्रतपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि युवकांच्या प्रगतीसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव हा इतर महिलांनाही सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
साहित्य, सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाचा अनोखा संगम!
‘शानदार दिवाळी अंक २०२६’ च्या प्रकाशन सोहळ्याने साहित्यिक उपक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला. एका बाजूला लेखकांच्या लेखणीचा सन्मान, दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूचा गौरव, तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेचा सशक्त नारी पुरस्काराने सन्मान, अशा विविध पैलूंनी हा कार्यक्रम समृद्ध झाला.
यातून साहित्य, क्रीडा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचा शबनम न्यूज मीडिया ग्रुपचा प्रयत्न अधोरेखित झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या सर्वेसर्वा शबनम सय्यद यांनी प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे, लेखकांचे, साहित्यप्रेमींचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले. प्रसिद्ध निवेदक सोमराज नाडे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.
मान्यवरांची मांदियाळी, साहित्यिकांचा सन्मान, हिरकणीच्या माध्यमातून नारीशक्तीचा गौरव आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार अशा विविध वैशिष्ट्यांनी ‘शानदार दिवाळी अंक २०२६’ चा प्रकाशन सोहळा संस्मरणीय ठरला. या दिवाळी अंकाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या या साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमाचे विशेष स्वागत केले जात आहे.
