पिंपरी चिंचवडबातम्या

पिंपरी येथील सावली निवारा केंद्रातील बेघर व्यक्तीबरोबर आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी केली दिवाळी साजरी…

नात्यांची ऊब हरवलेल्यां बेघर बांधवांशी साधला संवाद; ‘सावली’त रंगला मायेचा सोहळा!

बेघर व्यक्तींशी संवाद साधताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी भावूक; प्रत्येकाची आस्थेने केली विचारपूस, संस्थेच्या कार्याचेही केले कौतुक…

पिंपरी, ७ नोव्हेंबर २०२६ : – दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांसोबत साजरा होणारा जिव्हाळ्याचा सण… मात्र ज्यांच्या आयुष्यात नात्यांची साथ हरवली आहे, ज्यांच्या वाट्याला एकटेपणा आणि निराधारपणाचे दुःख आले आहे, अशा व्यक्तींसाठी सणांचे दिवसही अनेकदा भावनांनी भरलेले असतात. अशाच निराधार माता-पित्यांच्या आयुष्यात मायेचा प्रकाश पसरवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यंदाची दिवाळी ‘सावली’ निवारा केंद्रातील ७५ बेघर व्यक्तीसोबत साजरी केली

यावेळी त्यांनी त्यांचेसोबत दिवाळीचा फराळ करत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीचा संवाद साधला. या भेटीदरम्यान अनेकांच्या जीवनप्रवासातील वेदना, संघर्ष आणि सावली केंद्राकडून मिळणारा आधार जाणून घेताना आयुक्त भावूक झाले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून आणि ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेच्या सहकार्याने चालविण्यात येणारे ‘सावली’ निवारा केंद्र हे बेघर, निराधार आणि वंचित व्यक्तींसाठी हक्काचे घर बनले आहे. रस्त्यावर निराधार अवस्थेत आढळलेल्या, नातेवाईकांपासून दुरावलेल्या, मानसिक व शारीरिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना या केंद्रात सुरक्षित निवारा, अन्न, औषधोपचार आणि मायेची साथ दिली जाते,अनेकांसाठी हे केंद्र केवळ निवाऱ्याचे ठिकाण नसून आयुष्याच्या उत्तरार्धात लाभलेले एक नवे कुटुंबच आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या केंद्राला भेट देत येथे दिवाळी सण साजरा केला यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात, समाजसेवक ॲग्नस फ्रान्सिस आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या केंद्रामध्ये दिवाळी साजरा करताना प्रत्येकाची स्वतंत्रपणे आस्थेने विचारपूस केली. तुम्ही येथे कसे आलात, येथे तुमची काळजी कशी घेतली जाते, जेवण आणि औषधोपचार व्यवस्थित मिळतात का, काही अडचणी आहेत का, अशा विविध प्रश्नांतून त्यांनी प्रत्येकाच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केवळ औपचारिक संवाद न साधता प्रत्येक व्यक्तीसमोर थांबून त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी माणुसकीच्या नात्याने संवाद साधला.

या केंद्रातील काहींजणांनी त्यांच्या आयुष्यातील सांगितलेले प्रसंग व त्यांचा संघर्ष ह्रुदयद्रावक होता. आयुष्याच्या प्रवासात कधीतरी माणसांची साथ सुटली, नाती दुरावली; मात्र अशा व्यक्तींना पुन्हा जगण्याचा आधार देण्याचे काम ‘सावली’च्या माध्यमातून होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक लाभार्थ्याची घेतली जाणारी काळजी, त्यांना दिला जाणारा सन्मान आणि आपुलकीचे वातावरण याचेही त्यांनी कौतुक केले.

यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्राच्या कामकाजाची, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची तसेच संस्थेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती घेतली. निवारा केंद्र हा अत्यंत चांगला आणि समाजासाठी आवश्यक असलेला उपक्रम असल्याचे सांगत अशा केंद्रांमुळे समाजातील दुर्लक्षित आणि निराधार घटकांना जगण्याचा नवा आधार मिळतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्राच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली

दिवाळीच्या सणानिमित्त आयुक्तांनी दिलेली ही अनोखी भेट लाभार्थ्यांसाठी केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर त्यांच्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा क्षण ठरली. पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून प्रत्येक निराधार व्यक्तीशी आपुलकीने संवाद साधणाऱ्या आयुक्तांच्या भेटीने केंद्रातील वातावरणही भावूक झाले होते तर त्यांच्या भेटीचा सर्वांना झालेला आनंदही जाणवत होता. दिवाळीच्या प्रकाशपर्वात या निराधार माता-पित्यांच्या आयुष्यात मायेचा एक नवा दीप उजळविण्याचे काम या भेटीतून झाले.

सावली निवारा केंद्र हा समाजातील निराधार, बेघर आणि वंचित व्यक्तींना आधार देणारा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. दिवाळीसारखा आनंदाचा सण या माता-पित्यांसोबत साजरा करताना त्यांच्या भावना जाणून घेता आल्या. प्रत्येक व्यक्तीला केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा मिळणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची वागणूक मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सावली केंद्राच्या माध्यमातून हे काम संवेदनशीलतेने केले जात आहे. केंद्रातील प्रत्येक लाभार्थ्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. संस्थेतील स्थापत्य विषयक समस्या जाणून घेतल्या असून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका अधिका-यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका