पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

प्रभाग २३ कचरामुक्त करा

शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनची मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 23 कचरा मुक्त करावा व कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशन वतीने करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 23 मध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व साथीच्या रोगांचा धोका वाढत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन ‘ग’ प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांना तसेच प्रभाग अधिकारी मुकेश कोळप यांना देण्यात आले.

निवेदनात विशेषतः ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासमोरील मुख्य रस्ता, कावेरी नगर सबवे पुलाखालील परिसर तसेच थेरगावमधील विविध सार्वजनिक ठिकाणी सातत्याने कचरा टाकला जात असल्याचे नमूद करण्यात आले. महापालिकेकडून घराघरांत घंटागाडीची सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

फाउंडेशनच्या वतीने संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणे, नियमित स्वच्छता मोहीम राबविणे, “येथे कचरा टाकू नये” असे सूचना फलक लावणे, तसेच नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यानंतर ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उपद्रव पथकाला आवश्यक सूचना दिल्या. कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी जनजागृती मोहीम राबविणे, सूचना फलक लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत करणे आणि कचरा टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.

याचप्रमाणे, ‘ग’ प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांनीही निवेदनाची दखल घेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा शबनम सय्यद, उपाध्यक्षा गजाला सय्यद, सहसचिव आसिया इनामदार तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत प्रभाग क्रमांक २३ स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, ही जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. नागरिकांनी घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता महापालिकेच्या नियमित कचरा संकलन गाडीतच द्यावा. विशेषतः प्रभाग क्रमांक २३ मधील नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. स्वच्छ परिसर हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

  • मनिषा प्रमोद पवार
    ‘ग’ प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका


“आपला प्रभाग क्रमांक २३ कचरामुक्त व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मात्र, या मोहिमेत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असे मी सर्वांना आवाहन करते. नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध नाईलाजास्तव दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, जनजागृती मोहीम राबविणे आणि कचरामुक्त प्रभागासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. स्वच्छ प्रभाग ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

  • मुकेश कोळप
    ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी