पिंपरी चिंचवडबातम्यामहाराष्ट्र

बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करण्याची विश्वजीत बारणे यांची मागणी

पिंपरी : पिंपरी ते डांगे चौक–चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटले असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन पुलावरील तुटलेले कठडे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

या पुलावरून दररोज हजारो वाहनांची तसेच मोठ्या संख्येने पादचाऱ्यांची ये-जा होत असते. याच मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक नियमितपणे करतात. अशा परिस्थितीत तुटलेल्या कठड्यांमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे बारणे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तसेच संबंधित पुलाची तातडीने पाहणी करून तुटलेले कठडे दुरुस्त करण्यात यावेत आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षाविषयक उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जनहिताचा विचार करून या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विश्वजीत बारणे यांनी व्यक्त केली आहे.