आम आदमी पार्टीच्या आक्रमक पाठपुराव्याला यश! बालेवाडीतील म्हाडा धारकांच्या रस्त्यासाठी बिल्डरकडून अखेर पोलिसांत तक्रार; ‘आप’ युवा आघाडीचा दणका!*

पुणे : बालेवाडी येथील ’43 प्राव्हेट ड्राईव्ह’ या गृहप्रकल्पातील म्हाडा सोडतीद्वारे घर मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच हक्काच्या रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्या मुजोर बांधकाम व्यावसायिक व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरोधात आम आदमी पार्टीने (AAP) घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर मोठे यश आले आहे. ‘आप’च्या दणक्यानंतर आणि सततच्या पाठपुराव्यानंतर आता सचिन भंडारी बांधकाम व्यावसायिक ‘मे. एस. एस. प्रॉपर्टीज’ यांनी स्वतः पुढे येत म्हाडा सदनिकाधारकांसोबत बालेवाडी पोलीस ठाण्यात सोसायटी कमिटीविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
बालेवाडी येथील ’43 प्रिव्हेट ड्राईव्ह’ प्रकल्पात म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळालेल्या नागरिकांना सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आणि अंतर्गत रस्त्यावरून जाण्यास सोसायटीचे अधिकारी, बिल्डर व सुरक्षारक्षक अडवत होते. या अन्यायाविरोधात ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी 13 ऑक्टोबर 2026 रोजी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करून, बिल्डर आणि आर्किटेक्टवर कारवाईची जोरदार मागणी केली होती.
‘आप’च्या या इशाऱ्यानंतर आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या दि. 19/10/2026 रोजीच्या स्पष्ट आदेशानंतर – ज्यात म्हाडा धारकांना सामायिक रस्ते व सुविधांचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे – बिल्डर ‘मे. एस. एस. प्रॉपर्टीज’ने तात्काळ पावले उचलली. बिल्डर व म्हाडा धारकांनी संयुक्तपणे बालेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन अंतर्गत रस्ता अडवणाऱ्या सोसायटी कमिटीवर कारवाईची मागणी केली आहे.
आम आदमी पार्टीची भूमिका:
”सामान्य आणि गरीब म्हाडा धारकांवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या पाठपुराव्यामुळे आज बिल्डरलाही पोलिसांत जावे लागले आहे. केवळ तक्रार करून चालणार नाही, तर म्हाडा धारकांना त्यांचा हक्काचा रस्ता प्रत्यक्षात खुला होईपर्यंत आणि रस्ता अडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आम आदमी पार्टीचा हा लढा सुरूच राहील.”
— रविराज बबन काळे (प्रदेशाध्यक्ष, आप युवा आघाडी)
