बातम्याविशेष लेख

महर्षी कर्वे यांचे स्त्रीशिक्षणाचे स्वप्न : ११० वर्षांनंतरही समाजपरिवर्तनाची अखंड प्रेरणा!

एका महामानवाच्या आयुष्यभराच्या समर्पणातून उभी राहिलेली शिक्षणाची चळवळ आज लाखो महिलांच्या जीवनाला नवी दिशा देत आहे.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे केवळ स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते नव्हते, तर आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे महान शिल्पकार होते. स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, महिलांचे स्वावलंबन आणि सामाजिक समता या मूल्यांच्या आधारावर परिवर्तनशील समाज घडविण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. तत्कालीन समाजातील रूढी, परंपरा आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.

१८ एप्रिल १८५८ रोजी कोकणातील शेरवली येथे जन्मलेल्या महर्षी कर्वे यांचा जीवनप्रवास म्हणजे ध्येयवाद, संघर्ष, त्याग आणि निःस्वार्थ समाजसेवेचा प्रेरणादायी इतिहास आहे. विधवा पुनर्विवाहाला सामाजिक मान्यता मिळावी यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. १८९६ मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना, १९०७ मध्ये महिला विद्यालयाची सुरुवात आणि १९१० मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना अशा विविध उपक्रमांतून त्यांनी स्त्रीशिक्षण आणि समाजपरिवर्तनाची भक्कम पायाभरणी केली.

महर्षी कर्वे यांच्या कार्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९१६ मध्ये भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना. महिलांना उच्च शिक्षणाची स्वतंत्र संधी मिळावी, त्या शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हाव्यात आणि समाजात त्यांना समान प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. पुढे उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या नावाने हे विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. आज एसएनडीटी महिला विद्यापीठ ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून स्त्रीशिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या ऐतिहासिक चळवळीचे प्रतीक बनले आहे.

त्या काळात आजच्यासारखी साधनसामग्री, आर्थिक पाठबळ, आधुनिक तंत्रज्ञान किंवा अनुकूल सामाजिक परिस्थिती उपलब्ध नव्हती. मात्र, जिद्द, दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था उभी केली. साधनांची कमतरता असतानाही त्यांनी स्वप्न पाहिले, प्रतिकूल परिस्थितीत ते साकार केले आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकणारी शैक्षणिक परंपरा निर्माण केली. त्यांच्या या कार्याचे महत्त्व आज ११० वर्षांनंतरही तितकेच अधोरेखित होते.

आज आपण डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि जागतिक स्पर्धेच्या युगात वाटचाल करीत आहोत. मात्र, या सर्व प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेला महिलांना शिक्षणाचा समान अधिकार, संधींची उपलब्धता, स्वावलंबन आणि सामाजिक प्रतिष्ठा हा मूलभूत विचार महर्षी कर्वे यांनीच समाजात रुजविला. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ ऐतिहासिक महत्त्वाचे नसून वर्तमान आणि भविष्यकाळासाठीही मार्गदर्शक आहे.

महर्षी कर्वे यांनी लावलेल्या स्त्रीशिक्षणाच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा ११० वर्षांहून अधिक काळाचा प्रवास हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि त्यागाचा जिवंत वारसा आहे. आज विद्यापीठात सुमारे १ लाख १० हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर लाखो महिलांनी शिक्षण घेऊन स्वतःचे जीवन घडविले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. एका पिढीला शिक्षणापासून वंचित राहावे लागल्यानंतर पुढील पिढीला उच्च शिक्षणाची संधी मिळणे, हा केवळ शैक्षणिक बदल नसून सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा आहे.

शिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या संधी, आर्थिक स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. एका विद्यार्थिनीचे शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचे परिवर्तन नसून संपूर्ण कुटुंबाच्या आणि पुढील पिढीच्या प्रगतीचा पाया ठरत आहे. त्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार म्हणजे सक्षम कुटुंब, सुदृढ समाज आणि प्रगत राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

महर्षी कर्वे यांचे स्वप्न केवळ शहरांतील महिलांपुरते मर्यादित नव्हते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे, हीच त्यांच्या कार्यामागील मूलभूत भावना होती. हाच विचार पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठाने ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांतील महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला आहे. चंद्रपूर, श्रीवर्धन आणि पालघर यांसारख्या भागांमध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः आर्थिक आणि भौगोलिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना त्यांच्या परिसरातच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.

आज एसएनडीटी महिला विद्यापीठ महर्षी कर्वे यांच्या विचारांचा वारसा आधुनिक काळाच्या गरजांशी जोडत विकासाची नवी दिशा स्वीकारत आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून व सहकार्यातून विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संस्थात्मक विकासाला महत्त्वपूर्ण पाठबळ मिळत आहे.

ऐतिहासिक परंपरेचे जतन करतानाच नवीन अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप, उद्योजकता आणि उद्योगजगताशी जोडणी यांवर विद्यापीठ भर देत आहे. महिलांना केवळ पदवीधर बनविणे एवढेच विद्यापीठाचे उद्दिष्ट नसून त्यांना सक्षम व्यावसायिक, उद्योजक, संशोधक, नेतृत्वकर्त्या आणि समाजपरिवर्तनाच्या प्रतिनिधी म्हणून घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे. याच व्यापक दृष्टिकोनातून महर्षी कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणाच्या स्वप्नाला आधुनिक स्वरूप प्राप्त होत आहे.

महर्षी कर्वे यांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. स्वतःचे आयुष्य केवळ स्वतःसाठी न जगता ते समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले, तर एका व्यक्तीचे कार्य लाखो लोकांचे भविष्य घडवू शकते. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेली शिक्षणव्यवस्था आजही लाखो महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवत आहे. एका महामानवाने पाहिलेले स्वप्न आज लाखो महिलांच्या डोळ्यांत साकार होत आहे. एका व्यक्तीच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येने निर्माण झालेली संस्था अनेक पिढ्यांच्या भविष्याचा आधार बनली आहे.

महर्षी कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाचा विचार दिला, त्यासाठी संस्था उभी केली आणि समाजपरिवर्तनाची दिशा दाखविली. त्यांच्या या अमूल्य वारशाचे जतन करणे, त्याचा विस्तार करणे आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या शेवटच्या महिलेलाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या कार्याला खरी आदरांजली म्हणजे त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणाची चळवळ अधिक व्यापक करणे आणि प्रत्येक मुलीपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविणे होय.

महर्षी कर्वे यांचे कार्य काळाच्या पलीकडे जाणारे आहे. त्यांनी पाहिलेले स्वप्न आजही समाजाला प्रेरणा देत आहे आणि उद्याच्या सक्षम, स्वावलंबी व समताधिष्ठित भारताच्या निर्मितीचा मार्ग दाखवत आहे. त्यांच्या त्यागाला, दूरदृष्टीला आणि आयुष्यभराच्या निःस्वार्थ समर्पणाला कृतज्ञतापूर्वक सलाम!

भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!