मोठी बातमी! विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

पुणे / नाशिक : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाच्या निमित्ताने नाशिकमध्ये असताना, विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुदैवाने, या अपघातात आमदार अमित गोरखे व त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी थोडक्यात बचावले असून, सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत.
नाशिकमध्ये अपघात
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे, या अत्यंत महत्त्वाच्या आणि न्याय्य मागणीसाठी राज्यभरात आंदोलन, मोर्चे केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे एका भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चात वंचित व उपेक्षित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने आक्रमक भूमिका मांडणारे आमदार अमित गोरखे देखील सहभागी झाले होते. याच दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये हा अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील दौऱ्यादरम्यान आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या एका वाहनाशी अचानक धडक झाली.
सध्याची अपडेट
या दुर्घटनेत आमदार अमित गोरखे यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली असून, तातडीने त्यांना वैद्यकीय मदत व प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यासोबत असलेले सर्व सहप्रवासी, चालक आणि सुरक्षा रक्षक देखील सुखरूप आहेत. घटनेची माहिती समजताच संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी खळबळ उडाली होती.
आमदार अमित गोरखे यांनी सातत्याने समाजहिताच्या आणि उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर शासनाकडे आणि जनतेसमोर आपली ठाम भूमिका मांडली आहे.
