चिनी पर्यटकांचे हरवलेले पाकीट अर्ध्या तासात शोधले; चिंचवड पोलिसांची तत्परता

सेनापती बापट रोड येथून चिंचवड स्थानकाकडे आलेल्या दोन चिनी पर्यटकांचे पाकीट ओला कॅबमध्ये विसरले गेले. चिंचवड स्थानकात आल्यानंतर पाकीट हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. परदेशी पर्यटकांच्या या तक्रारीची पोलिसांनी तत्काळ दखल घेत अवघ्या काही मिनिटांत शोधमोहीम सुरू केली.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत पीएसआय किरण बळीप आणि एपीआय जीवन शेरखाने यांना हरवलेले पाकीट शोधण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पर्यटकांनी प्रवास केलेल्या कॅबची माहिती घेऊन संबंधित वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संबंधित कॅब चालकाचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्याच्याशी संपर्क साधून त्याला चिंचवड येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर कॅबची तपासणी केली असता चिनी पर्यटकांचे हरवलेले पाकीट वाहनामध्येच आढळून आले.
पोलिसांनी पाकीट ताब्यात घेऊन आवश्यक खात्री केल्यानंतर ते दोन्ही चिनी पर्यटकांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पोलिसांनी पाकीट शोधून काढल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला.
हरवलेले पाकीट परत मिळाल्यानंतर दोन्ही चिनी पर्यटकांनी चिंचवड पोलिसांचे मनापासून आभार मानले. परदेशातून आलेल्या पर्यटकांना आलेल्या अडचणीच्या प्रसंगी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे त्यांनी कौतुक केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण बळीप आणि
एपीआय जीवन शेरखाने यांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे ही घटना अवघ्या काही वेळातच मार्गी लागली. चिंचवड पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे पोलिसांकडून नागरिकांसह परदेशी पर्यटकांनाही तत्पर मदत मिळत असल्याचे अधोरेखित झाले.
