पुणेबातम्या

पुण्यातील खराडी भागातील क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडावर बेकायदा उभारण्यात आलेली ६ मजली इमारत पुणे महापालिकेने अखेर जमीनदोस्त केली आहे.

पुणे : खेळासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर बेकायदा बांधकाम करून सहा मजली बांधलेली इमारत पुणे महापालिकेने जमीनदोस्त केली. या बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने तीन वेळा कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही सहा मजली इमारत बांधण्यात आली होती.

खराडी येथील सर्व्हे क्रमांक ६३ आणि लाइन क्रमांक १२ येथील सुमारे २१ हजार चौरस फुटांचा भूखंड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. हा भूखंड अनेक वर्षांपासून मोकळा आहे. याचा फायदा घेत दोन विकासकांनी त्यावर अतिक्रमण करून महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता तेथे परस्पर बांधकाम सुरू केले. महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर बांधकाम केले जात असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याविरोधात तक्रारी केल्या. →

या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेच्या बांधकाम विभागाने यापूर्वी तीन वेळा अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मात्र त्यानंतरही संबंधित विकासकांनी याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवले. गेल्या काही महिन्यांपासून हे बांधकाम सुरू होते. या भागात सहा मजली बांधकाम झाल्यानंतरही ते पाडले जात नसल्याने नागरिकांनी ही बाब पुन्हा महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
‘महापालिकेच्या बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी कारवाई करून हे बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात केली,’ अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांनी दिली. ‘या बांधकामावर कारवाई करून महापालिकेने नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही बांधकाम झाल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असून, कारवाईचा सर्व खर्च नियमानुसार वसूल केला जाईल,’ असेही त्यांनी नमूद केले.

इमारत उभी राहिलीच कशी?

पुणे महापालिकेने या इमारतीवर दोनदा कारवाई केली. असे असतानाही सहा मजली इमारत उभी राहिलीच कशी, आरक्षित भूखंडावर एवढे मोठे बांधकाम उभे राहत असताना संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे लक्ष का गेले नाही, असे सवाल नागरिकांनी उपस्थित केले. यामागे राजकीय वरदहस्त होता का, तसेच कारवाईसाठी एवढा विलंब का झाला, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चौकशी करणार

पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले, महापालिकेच्या विकास आराखड्यात या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. ही जागा खासगी मालकीची असून, अद्याप महापालिकेच्या ताब्यात नाही. मात्र, परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले. बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. सहा मजल्यांचे बांधकाम होईपर्यंत संबंधित अधिकारी काय करत होते, याची चौकशी केली जाणार आहे.