‘पवना’त पाण्यावर तरंगणारे सौर ऊर्जा पॅनल; वीजनिर्मितीसाठी पिंपरी महापालिकेचे नियोजन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना धरणातील पाण्यावर तरंगणारे (फ्लोटिंग) सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून वीजनिर्मिती केली जाणार असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.
महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये, शाळा, रुग्णालये, महापालिका भवन, गोदाम, क्रीडा संकुले, नाट्यगृहे, पाणी शुद्धीकरण केंद्रे अशा वेगवेगळ्या २६४ प्रशासकीय इमारती आहेत. त्यांपैकी ९५ इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. इतर २१ इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित १४८ इमारतींवर यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात सुका कचरा जाळून १४ मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेने वीजदेयकापोटी १५८ कोटी रुपये महावितरण कंपनीला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणावर पाण्यावर तरंगणारे (फ्लोटिंग) सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहेत.
या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पात या कामाचा समावेश करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रीय कार्यालये, क्रीडासंकुले, नाट्यगृहे, शाळा व सर्व इमारतींवर पॅनल बसविण्यासाठी ३७.१० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. या लेखाशीर्षावरील एक लाख रुपयांची तरतूद अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीजनिर्मिती करणे या लेखाशीर्षात वाढवण्यात आली आहे.
या निधीतून पवना धरणावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्याच्या कामाचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. तसेच, एक कोटी रुपयांच्या तरतुदीस प्रशासकीय मान्यता देणे आणि तरतुदीत वाढ-घट करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पवना धरणावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्याबाबतचा सदस्यांचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेच्या विद्युत विभागाने सांगितले.
पवना धरणातून ५४० एमएलडी पाणीपुरवठा
सद्यःस्थितीत पवना धरणातून ५४०, आंद्रातून ९५ आणि एमआयडीसीकडून ३० असे ६६५ एमएलडी पाणी एका दिवसाला महापालिका उचलते. शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. या निर्णयाला पुढील महिन्यात सात वर्ष पूर्ण होतील.
त्यानंतरही एक दिवसाआडच पाणीपुरवठा कायम आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात पर्जन्यमानात मोठी घट झाली आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना आणि आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. दुष्काळाच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. या आदेशाची पिंपरी-चिंचवड शहरातही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेसाठी पवना आणि आंद्रा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात होणार आहे.
