पुण्यात रंगणार ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’; नवरात्रोत्सवात संस्कृती, कला आणि मनोरंजनाचा जल्लोष
११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; गरबा, दांडिया, लावणी, संगीत, नृत्य अन् रावणदहनाचा थरार

पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त **शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल – नवरात्र उत्सव २०२६’**चे आयोजन लोकमान्यनगर, जॉगिंग पार्कजवळ, नवी पेठ येथे करण्यात आले आहे. यंदाचे २९ वे वर्ष असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख समन्वय साधत पुणेकरांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, निमंत्रक शुभांगी सातपुते आणि उत्सव अध्यक्ष डॉ. नरेश मित्तल हे आहेत.रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य उद्घाटन सोहळा व देवीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून शौर्य ढोल-ताशा पथक हे विशेष आकर्षण असणार आहे.
त्यानंतर १२ ऑक्टोबरला ‘साई दरबार’, १३ ऑक्टोबरला ‘पाहणं तुम्ही म्हणाल तसं’ लावणी कार्यक्रम, १४ ऑक्टोबरला ‘गीतों का सफर’, तर १५ ऑक्टोबरला लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१६ ऑक्टोबरला महाकाली तांडव नृत्य लाईव्ह शो, १७ ऑक्टोबरला महिलांसाठी ‘रास रिदम गरबा नाईट’, १८ ऑक्टोबरला ग्रुप डान्स/सोलो डान्स स्पर्धा आणि १९ ऑक्टोबरला दांडिया कार्यक्रम होणार आहे.
२० ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त रावणदहन, तर २५ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘टेंशन खल्लास’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.विशेष म्हणजे महोत्सवातील सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या वतीने करण्यात आले आहे.
