पिंपरी चिंचवडबातम्या

महापालिका मुख्यालयात दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र

  • आमदार महेश लांडगे यांची सूचना अन्‌ महापालिका प्रशासनाची कार्यवाही
  • पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे दि.३१ जानेवारी २०२६ रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करण्यात आली आहे.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या माहितीनुसार, आमदार लांडगे यांनी महापालिका मुख्यालयात दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने कार्यवाही केली. स्थापत्य विभागामार्फत मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात तैलचित्र लावण्यात आल्याचे प्रशासनाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तैलचित्र लावण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, प्रत्यक्ष तैलचित्र लावण्याचे कामही पूर्ण झाले आहे, असे महापालिकेने कळविले आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता–१ प्रमोद ओंभासे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आमदार महेश लांडगे यांना पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये लांडगे यांच्या मागणीचा संदर्भ देत केलेल्या कार्यवाहीची माहिती नमूद करण्यात आली आहे.

महापालिका मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आणि अभ्यागतांच्या नजरेस पडेल अशा प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात हे तैलचित्र लावण्यात आले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना महापालिकेच्या मुख्य कार्यालयात स्थान देण्यासंदर्भातील मागणीवर प्रशासनाने कार्यवाही पूर्ण केल्याची अधिकृत नोंद या पत्राद्वारे करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील रस्ते रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी अजित पवार यांनी पाठपुरावा केला होता. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विकास प्रकल्पांच्या प्रत्यक्ष पाहण्या आणि प्रशासकीय आढावा बैठकांमधूनही त्यांनी कामांच्या अंमलबजावणीवर लक्ष दिले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. याबाबत कृतज्ञता म्हणून महापालिका मुख्यालयात त्यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.


“अजितदादांनी पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. विकासकामांना गती देण्याची त्यांची हातोटी, प्रशासनावरील पकड आणि कामाच्या दर्जाबाबतचा आग्रह कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या या नेतृत्वाच्या स्मृती महापालिका मुख्यालयात जपल्या जाव्यात, या भावनेतून मी त्यांच्या तैलचित्राची मागणी केली होती. प्रशासनाने त्याची पूर्तता केली, याचे समाधान आहे. त्यांच्या कार्यातून लोकहितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळत राहील.”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.