पिंपरी चिंचवडबातम्या

पुणे फेस्टिवल वतीने पत्रकार शबनम सय्यद यांचा सन्मान

‘पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्याकडून कौतुक; संचालिका शबनम सय्यद यांचा सन्मान

पुणे : पुण्यात नुकताच ३८ वा पुणे फेस्टिवल मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कला आणि मनोरंजनाची मेजवानी ठरलेल्या या फेस्टिवलमधील विविध उपक्रमांचे प्रभावी वृत्तांकन करण्याची संधी शबनम न्यूज मीडिया ग्रुपला मिळाली.

पुणे फेस्टिवलदरम्यान झालेल्या विविध कार्यक्रमांच्या बातम्या एकत्रित करून शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या वतीने ‘पुणे फेस्टिवल वृत्तांत विशेष’ हे आकर्षक बुकलेट तयार करण्यात आले. या बुकलेटमध्ये फेस्टिवलमधील प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची बातमी आणि त्याचा वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हे विशेष बुकलेट पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना भेट देण्यात आले. त्यांनी बुकलेटचे आनंदाने स्वागत करत त्याच्या आकर्षक मांडणीचे तसेच संपूर्ण फेस्टिवलचे सातत्याने केलेल्या वृत्तांकनाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

दरम्यान, पुणे फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिवलच्या यशामागे योगदान देणाऱ्या पदाधिकारी, विश्वस्त, समिती प्रमुख आणि कार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले.

याच कृतज्ञता सोहळ्यात शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संचालिका शबनम सय्यद यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुणे फेस्टिवलच्या चेअरपर्सन मीरा कलमाडी यांच्या हस्ते शबनम सय्यद यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई, उपाध्यक्ष सुभाष सनस, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह पुणे फेस्टिवलचे विश्वस्त, समिती प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

‘पुणे फेस्टिवल वृत्तांत विशेष’ या बुकलेटमध्ये प्रत्येक कार्यक्रमाचे स्वतंत्रपणे प्रभावी वृत्तांकन करण्यात आले असून, आकर्षक स्वरूपात तयार करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पुणे फेस्टिवलच्या पदाधिकारी आणि विश्वस्तांकडून विशेष कौतुक करण्यात आले. शबनम न्यूज मीडिया ग्रुपने केलेले हे वृत्तांकन पुणे फेस्टिवलच्या सांस्कृतिक वाटचालीचा दस्तऐवज ठरणारे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.